राधानगरी/कोल्हापूर : नजर खिळवून ठेवणाऱ्या, नक्षीदार, नाजूक, अतिशय लहान प्रजातीपासून ते पॅरिस पिकॉकसारख्या दुर्मिळ आणि मनमोहक फुलपाखरांपर्यंतच्या सुमारे ८९ विविध फुलपाखरांच्या जगात शनिवारी रसिक गारुड झाल्याप्रमाणे थबकले होते.जैवविविधतेने समृद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्य परिसरात बायसन नेचर क्लब आणि वन्यजीव विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी फुलपाखरू महोत्सवास प्रारंभ झाला. राज्यातील पहिला फुलपाखरांचा महोत्सव याच ठिकाणी २०१५ मध्ये घेण्यात आला होता. ग्रास यलो, स्ट्राईप टायगर, प्लेन टायगर, कॉमन क्रो, कॉमन फोट टिंग, ब्ल्यू टायगड, ग्रास ज्युअेल, ब्ल्यूज, रेड पिअरेर, चॉकलेट पेन्सी, कॉमन सेलर, जिजबेल, ऑरेंज स्ट्रीप, लेपर्ड, कॉमन मॉर्मन, डिनाईड एग फ्लाय, पॅरिस पिकॉक यासारख्या अतिशय दुर्मिळ आणि सुंदर फुलपाखरांचे दर्शन आज झाले. दिवसभरात महोत्सव पहायला आलेल्यांना सुमारे ८९ विविध प्रजाती येथे पहायला मिळाल्या.२४ फुलपाखरांचा जीवनक्रम पूर्णराधानगरी येथे वन्यजीव विभागाने ११ गुंठे परिसरात आकर्षक फुलपाखरू उद्यान उभे केले आहे. राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य डॉ. सुहास वायंगणकर यांनी फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या रोपांची जाणीवपूर्वक लागवड करुन हे उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात २४ फुलपाखरांचा जीवनक्रम पूर्ण झाला आहे. याची माहीतीही वायंगणकर यांनी दिली आहे.
सकाळच्या सत्रात अभ्यासक,विद्यार्थी,पर्यटकांनी फुलपाखरू भ्रमंती केली. सुनील करकरे, डॉ. सुहास वायंगणकर या वन्यजीव अभ्यासकांकडून फुलपाखरू,पतगविषयी माहितीही देण्यात आली.
या कार्यक्रमास खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबिटकर,पंचायत समितीचे माजी सभापती अभिजित तायशेटे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे संचालक, मुख्य वन्यजीव संरक्षक समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी विशाल माळी, अमरजा निंबाळकर, सुरेश कुऱ्हाडे, राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी, मिथुन पारकर, वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे, नामदेव पाटील आदि उपस्थित होते. प्रारंभी स्वागत नेचर क्लबचे अध्यक्ष सम्राट केरकर यांनी केले तर दयानंद सावर्डेकर यांनी आभार मानले.