कोल्हापूर : महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीत ३०० टन लाकूड शिल्लक असले तरी आणखी २०० टन लाकूड खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उपायुक्त निखिल मोरे यांनी शुक्रवारी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.महापौर निलोफर आजरेकर यांनी पदाधिकाऱ्यांसह स्मशानभूमीला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. त्यांच्या सोबत स्थायी सभापती संदीप कवाळे, गटनेते शारगंधर देशमुख, नगरसेवक जय पटकारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शेणी व लाकडासाठी असलेले शेड मोडकळीस आलेले असून, त्याची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे जय पटकारे यांनी सांगितले. गॅस दाहिनीपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाकडाचे ओंढके मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण होत असून, याठिकाणीही लाकडांसाठी एक शेड बांधावे, असेही त्यांनी सांगितले.स्मशानभूमीत येणारे लाकडाचे ओंढके आवश्यकतेनुसार कटिंगसाठी टिंबर मार्केटला नेले जातात; पंरतु तेथून वेळेवर कटिंग होऊन मिळत नाहीत, असे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी सांगितले. तेव्हा कवाळे यांनी ठेकेदाराकडून कटिंग करूनच लाकूड घेण्याची सूचना केली.
महापौर आजरेकर यांनी वर्षानुवर्षे पडलेले लाकडाचे ओंढके तातडीने एजन्सीमार्फत जागेवर अथवा आवश्यकता भासल्यास टिंबर मार्केटला नेऊन कटिंग करणयाच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या. तसेच याठिकाणी शेणी व लाकडाचे गोडावून तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना उपशहर अभियंता यांना दिल्या.