कोल्हापूर : ताराबाई पार्कातील पाण्याच्या टाकीचे छत खराब झाल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून येथून टाकीत पाणी न सोडता ई वॉर्डमधील ८ प्रभागांना बायपासने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला तसेच तात्काळ टाकीचे काम पूर्ण करण्याचे आदेश आयु्क्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकातील पाण्याच्या टाकीचे छत खराब झाले आहे. त्यामुळे टाकीत पक्षी पडत असून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी सभागृहात निदर्शनास आणले तसेच गटनेते सत्यजित कदम यांनीही मंगळवार (दि. २७)पासून टाकीखाली आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. त्याची गंभीर दखल आयु्क्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घेत सोमवारी सभा संपल्यानंतर त्वरित टाकीची पाहणी केली.
तत्काळ टाकीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी बायपासने प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला. यावेळी टाकीच्या कामासाठी आणखीन दोन महिन्यांचा अवधी लागेल, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, खानविलकर पेट्रोल पंप, महावीर उद्यान, नागाळा पार्क, कनाननगर, ताराबाई पार्क, सर्किट हाऊस, कदमवाडी, विचारेमाळ, आदी ठिकाणी बायपासने पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.