कोल्हापूर : तिरडी स्मशानात घेऊन जाताना ‘येतोस का डबल सीट?’ अशी चेष्टा करण्यात माहीर असलेल्या कोल्हापूरकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या कर्फ्यूलाही सोडले नाही. ‘आलाय कोरोना तर घरात बसा ना!’ असा संदेश सर्वत्र धुमाकूळ घालत असताना कोल्हापूरकरांनी मात्र सुट्टी आणि सुग्रास भोजनाचा आनंद घेत मोबाईलवरील संदेशांतून धुरळा उडवून दिला.
‘एक दिवस घरात बसा; नाहीतर पुढचे तेरा दिवस भावकीच घरात बसायला येईल,’ असे मेसेज पाठवून कोल्हापूरकरांच्या चेष्टेचा नाद करायचा नाही, हेच दाखवून दिले.रविवारी देशभर कर्फ्यू असल्याने नागरिकांना सक्तीने घरात बसावे लागले. पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने उंबऱ्याबाहेर कुणालाच पडता आले नाही. बाहेर काय चाललंय हे एक तर टीव्ही आणि हातातील मोबाईलवरील सोशल मीडियावरून कळत होते. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून लोकांनी संदेशांची देवाणघेवाण केली.
कोरोनाची धास्ती मनात आहेच; पण तिलाही चेष्टेचा सूर लावण्याचा कल प्रत्येक संदेशातून दिसत होता. मानवी स्वभावातील व्यंगांवर अचूक बोट ठेवणारे, कोरोनापासून सावध करणाºया मेसेजबरोबरच गमतीशीर संदेशांनी चेहऱ्यावर हास्य फुलविले.घरातच बसावे लागल्याने अनेकांनी ‘घरात बसून आहे तर ‘बिग बॉस’मध्ये असल्यासारखे वाटायला लागलंय. नुसती भांडणं आणि टोमणे सुरू आहेत घरात,’ अशी मिश्किल टिप्पणी केली. टाळ्या वाजविण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनावर ‘एक टाळी तिच्यासाठीपण वाजवा, जी सकाळी उठल्यापासून तुमच्यासाठी गॅसजवळ उभी आहे,’ असे सांगून महिलांची कदर करण्याचा सल्लाही दिला.
‘कोणी गेल्यावर गाव बंद ठेवलेले अनेकदा पाहिलंय; पण कोणी जाऊ नये म्हणून गाव बंद झालेले आज पहिल्यांदा पाहिलंय,’ असे सांगत यामागची दाहकताही समोर आणली. ‘ही जीवनातील अशी पहिली शर्यत आहे, जिथे थांबणारा जिंकणार आहे,’ असे सांगून वेळ आणि काळ आल्यावर कसे बदलते, यावर अचूक भाष्य केले. ‘जनता कर्फ्यू रात्री नऊ वाजेपर्यंत आहे, त्यानंतर भारत वर्ल्ड कप जिंकल्यासारखं बाहेर नका पडू नका,’ असे सांगत कोल्हापूरकरांना गमतीतूनच टोमणेही मारले.)