आजरा : आजरा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन ५० खाटांचे रुग्णालय करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली जाईल व आरोग्यासाठी आवश्यक असणारी सेवा व त्यासाठी लागणारे कर्मचारी आरोग्य विभागामार्फत तातडीने दिले जातील, असे आश्वासन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी दिले.
आजरा-चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन केलेल्या मागणीनुसार मंत्रालयात मंत्री व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. ‘लोकमत’मध्ये ‘आजरा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव २३ कोटींवर (२६ मे) व ग्रामीण रुग्णालयाला कोणी डॉक्टर देता का डॉक्टर’ (दि. ६ जून ) या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत मंत्रालयात बैठक झाली.
आजरा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन ५० खाटांचे रुग्णालय करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला आहे. मात्र, हा प्रस्ताव गेली ९ वर्षे शासनाच्या लालफितीत अडकून बसला आहे. आजरा ग्रामीण रुग्णालयाशेजारी ४२०० चौरस मीटर इतकी उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध आहे; पण शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे आजऱ्यासारख्या ग्रामीण भागातील जनतेचे डॉक्टरांअभावी हाल होत आहेत.
आजरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका पदापर्यंतच्या सर्व जागा रिक्त आहेत. सध्या कंत्राटी अधिकाऱ्यांकडे आजरा रुग्णालयाचा कार्यभार आहे. संबधित माहितीच्या आधारे आजरा ग्रामीण रुग्णालयास ‘कोणी डॉक्टर देता का डॉक्टर’ असे ठळक वृत्त दिले होते. आमदार राजेश पाटील यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्यासोबत अधिकाऱ्यांशी बैठक घडवून आणली.
बैठकीत आजरा व चंदगड ग्रामीण रुग्णालयांच्या प्रस्तावाबाबत चर्चा झाली. आजऱ्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेऊन मंजूर केला जाईल. चंदगड रुग्णालयाच्या प्रस्तावात असणाऱ्या त्रुटी तातडीने दूर कराव्यात. नागरिकांना आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा व त्यासाठी लागणारे कर्मचारी आरोग्य विभागामार्फत तातडीने दिले जातील. याबाबतच्या सूचना नामदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
-----------------------
फोटो ओळी : आजरा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत राजेंद्र पाटील यांनी चर्चा केली. या वेळी आमदार राजेश पाटील, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
क्रमांक : ०९०६२०२१-गड-०२