विजयकुमार कांबळे --अडकूर --गोवा सरकारने मद्यनिर्मितीला परवानगी दिल्याने गोव्यातील व्यापारी तालुक्यातील काजू उत्पादन शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने बोंडाची खरेदी करून त्या बोंडापासून मोठ्या प्रमाणात नफा मिळविला जातो. यातून स्थानिक शेतकऱ्यांच्या हाती धुपाटणेच अशी अवस्था झाली आहे.गोव्याची फेणी प्रसिद्ध आहे. मात्र, त्यासाठी लागणारा कच्चा माल चंदगड, आजरा गडहिंग्लज तालुक्यातून नेला जातो. गोव्यातील व्यापारी आंबोलीपासून कानूर, इब्राहिमपूर, नागनवाडी, अडकूर, सातवणे, आमरोळी, आसगोळी, केंचेवाडी, दाटे, पाटणे फाटा, तुर्केवाडी, कार्वे ते शिनोळीपर्यंत बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या ठिकाणची काजू बोंड खरेदी करतात. त्यासाठी स्वत:ची चारचाकी मालवाहू टेम्पो घेऊन गावोगावी फिरतात. काजू बागा असलेल्या ठिकाणी जाऊन काजू बोंडाची खरेदी कवडीमोल भावाने करून त्यापासून गोव्यामध्ये मद्यनिर्मिती केली जाते. या मद्यनिर्मितीपासून कोट्यवधी रूपये कमविले जातात. काजूचे हे बोंड पूर्ण पिकलेले असताना चांगले दिसते. मात्र, ते दोन-तीन दिवस तसेच राहिल्यास त्याला विशिष्ट प्रकारचा वास सुटून ते कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. काजू बोंड हा घटक नाशवंत असल्यामुळे त्याची दररोज उचल होणे गरजेचे आहे. काजू बोंड खरेदी करणारे गोव्याचे व्यापारी १० ते १२ किलोच्या डब्याला १० रूपये इतक्या कमी दराने खरेदी करतात. त्यावर प्रक्रिया करून त्यापासून मद्यनिर्मिती करून कोट्यवधी रूपयांचा नफा मिळवितात. मात्र उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळत नाही. अशी अवस्था काजू बागायत शेतकऱ्यांची पहावयास मिळत आहे. म्हणून तालुक्यात काजू बोंड प्रक्रियेची गरज आहे. (उत्तरार्ध)
चंदगडचे काजूबोंड गोव्याच्या बाजारपेठेत
By admin | Published: May 06, 2016 11:32 PM