कोल्हापूर : खरेदीचा बहाणा करून विविध राज्यांत मोठ्या नामवंत कंपन्यांच्या दुकानदारांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा प्रमुख संशयित अनिल तुळशीराम जोशी (रा. मालाड (पश्चिम), मुंबई) याने नामांकित हॉटेलमध्ये बोलावून फसवणूक करीत असल्याची कबुली कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिली. मंगळवारी संशयित जोशीला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी तपासात त्याने ही माहिती पोलिसांना दिली. विविध राज्यांत सहा फसवणुकीचे गुन्हे त्याने केले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
भारतातील कोणत्याही शहरात आम्ही आधी इंटरनेटवरून त्या शहरातील नामांकित कंपन्यांची घड्याळे, कॅमेरा, लॅपटॉप व मोबाईल कंपनीच्या शोरुमचा संपर्क नंबर मिळवितो. त्यानंतर इंग्रजीमधून फोनवरून मी एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर काम करणारा कर्मचारी’असल्याचे भासवतो. तसेच त्या शहरातील सर्वांत मोठ्या हॉटेलचे नाव सांगून त्याठिकाणी आम्ही थांबणार असल्याचे संबधित दूकानदारांना सांगतो.
आज आमचे बॉस येथे येणार आहेत. आम्ही आमच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरला काहीतरी गिफ्ट देणार आहे. त्याकरिता आम्हाला आपल्या दुकानातून अथवा शोरुममधून मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करणार आहोत. आमचे बॉस हे फार मोठे असून, त्यांना दुकानात येऊन वस्तू पाहण्याकरिता वेळ नसल्याचे सांगतो.
आपण स्वत: आम्हाला त्या वस्तू दाखविण्याकरिता त्याचे दहा ते १२ सॅम्पल घेऊन आम्ही थांबलेल्या हॉटेलमध्ये तुम्ही या, असे सांगून दुकानदारांचा विश्वास संपादन करतो. त्यानंतर ज्या शहरात गुन्हा करावयाचा आहे त्या शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये दोन खोल्या आरक्षित करतो आणि त्यातील एका खोलीमध्ये संबधित दुकानदारास त्यांच्या दुकानातील किमती वस्तू घेऊन बोलावितो. दुकानदारास एका खोलीमध्ये बसवितो व आमचे बॉस हे दुसऱ्या खोलीमध्ये बैठकीमध्ये व्यस्त असल्याचे भासवितो.
‘तुम्ही येथेच बसा. मी त्या वस्तू बॉसला दाखवून त्याची मान्यता घेऊन येतो’ असे त्या दुकानदाराला सांगतो. त्यानंतर दुकानदाराने आणलेल्या वस्तू बाजूच्या दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जातो व त्या वस्तू घेऊन आम्ही परस्पर निघून जातो, अशी माहिती संशयित टोळीप्रमुख अनिल जोशी याने पोलिसांना दिली आहे.