लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संवर्धनानंतर अवघ्या दोन वर्षांतच अंबाबाई मूर्तीवर पांढरे डाग पडू लागले आहे. मूर्तीवरील चकाकीचा थर कमी झाला आहे. या मूर्तीची पाहणी करण्यासाठी आज, शुक्रवारी औरंगाबाद पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक मिश्रा येत आहेत. त्यांच्यासोबत श्रीपूजक, देवस्थान आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक बोलावली जावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी देवस्थान समितीकडे केली आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही सहसचिव शिवाजीराव साळवी यांना देण्यात आले. अंबाबाई मूर्तीवर पांढरे डाग पडल्याची घटना चार दिवसांपूर्वी उघडकीस आली. त्याबाबत देवस्थान समितीला जाब विचारण्यासाठी गुरुवारी शिवसेना शिष्टमंडळाने समितीचे सदस्य व अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे उपस्थित होत्या. सहसचिव साळवी यांना या प्रकरणाची काहीच माहिती नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी साळवींच्या विरोधात घोषणात देत त्यांना हटवण्याची मागणी केली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाबाई मंदिर हे धार्मिक क्षेत्र आहे. ती कुणाची खासगी मालमत्ता किंवा प्रयोगशाळा नाही. संवर्धनानंतर पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी १०० वर्षांची हमी दिलेली असताना दोनच वर्षांत डाग कसे पडले. पूर्वी मोगलांपासून मूर्ती सांभाळावी लागत होती. आता पुरातत्त्व विभागापासून सांभाळावी लागत आहे. शुक्रवारी पुरातत्त्व अधिकारी मूर्तीची पाहणी करणार आहेत तेव्हा त्या अधिकाऱ्यांबरोबर शिवसेनेची बैठक बोलवा. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अर्ध्या मूर्तीचेच संवर्धन का केले, दर्जाबाबत १०० वर्षांची हमी दिलेली का, देवीची पूजा बांधल्यावर किती श्रीपूजक गाभाऱ्यात असणे आवश्यक आहेत या प्रश्नांवर खुलासा मागितला आहे. देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव यांनी संवर्धन प्रक्रियेवेळची सीडी व अहवालाची लेखी मागणी देवस्थान समितीकडे केली असल्याचे स्पष्ट केले. यावेळी हर्षल सुर्वे, राजेंद्र जाधव, शशिकांत बिडकर, अवधूत साळोखे, राजू यादव, दीपाली शिंदे, सुनील निकम, कमल पाटील, शुभांगी पोवार, दिलीप शिंदे, रणजित आयरेकर, सुनील पोवार, भगवान कदम आदी उपस्थित होते. सीडी नहीं बॉम्ब.. संगीता खाडे म्हणाल्या, संवर्धन प्रक्रियेत देवस्थान समितीची भूमिका केवळ प्रक्रियेचा खर्च करण्यापुरती मर्यादित होती. संवर्धनाची सगळी जबाबदारी पुजारी व पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांकडे होती. संवर्धन झाल्यानंतर हे अधिकारी रात्रीतून घाईघाईने निघून गेले तेव्हाच आम्हाला शंका आली. जाण्यापूर्वी त्यांनी संवर्धन प्रक्रिया करतानाची सीडी तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे दिली. त्यानंतर सैनी यांनी सीडी सचिवांना देत ‘इसे अपने पासही संभालके रखो किसीको दिखाना मत. ये सीडी नहीं बॉम्ब हैं’ असे म्हणाले. त्यानंतर ही सीडी आम्हालाही दाखविण्यात आलेली नाही आता लक्षात आले की अधिकारी घाईने का गेले. आम्हा सदस्यांना कधीच विचारात घेतले जात नाही. पावित्र्य राखा शिवसेनेचे सुजित चव्हाण म्हणाले, देवीच्या गाभाऱ्यात गुटखा, मावा खात असलेले पुजारी आम्ही पाहिले आहेत. गेले काही दिवस मंदिराच्या आतील पावित्र्याबाबतही काही घटना उघडकीस आल्या आहेत. मंदिर स्वच्छ करताना त्याचे पुरावे सापडले आहेत. याचा बंदोबस्त करा, अथवा शिवसेना त्यासाठी समर्थ आहे.