कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, प्लास्टिकचा वापर केला म्हणून, सन्मानचिन्ह तयार करणाऱ्या स्वरूप एजन्सीला पाच हजार रुपये दंड केला. या कारवाईमुळे संयोजकदेखील हिरमुसले.शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने सोमवारी (दि. ९) ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आयुक्त कलशेट्टी यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. या सन्मानचिन्हास प्लास्टिकचे कव्हर असल्याचे आयुक्त यांच्या निदर्शनास आले.त्यामुळे त्यांनी सदरचे सन्मानचिन्ह तयार करणाऱ्या एजन्सीचा शोध घेण्याच्या सूचना विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांना दिल्या. त्यानुसार राजगोळकर यांनी प्रतिभानगर, पायमल वसाहत येथे जाऊन सन्मानचिन्ह तयार करणाऱ्या स्वरूप एजन्सीचा शोध घेतला. त्यांना प्लास्टिक कव्हर लावल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंड केला.कोल्हापूर शहर ३१ मार्चपर्यंत प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची आवश्यकता असून शहर स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त करावे, असे आवाहन कलशेट्टी यांनी कार्यक्रमात केले.