कोल्हापूर : महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॅईज फेडरेशनच्या वतीने आज, मंगळवारपासून बँक खासगीकरण विरोधी अभियानाची सुरुवात होत आहे. यामध्ये पाच हजार शाखांतील कर्मचारी सहभागी हाेणार असून, खासगीकरणाविरोधात सरपंच ते लोकसभा, राज्यसभा सदस्यांपर्यतं सह्यांची मोहीम राबवली जाणार असल्याची माहीती फेडरेशनच्या वतीने देण्यात आली.
केंद्र सरकारने बँकांचे खासगीकरण सुरू केले आहे. त्यामुळे बँकेचे कर्मचारी अस्वस्थत आहेतच. त्याचबरोबर या बँकांशी जोडलेल्या ग्राहकांमध्ये नाराजी आहे. खासगीकरणाविरोधात कर्मचारी युनियनने काम बंद आंदोलने केली आहेत. तरीही केंद्र सरकार दाद देत नाही. यासाठी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॅईज फेडरेशनच्या वतीने आजपासून बँक खासगीकरण विरोधी अभियानाची सुरुवात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे पदाधिकारी जनतेशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून खासगीकरणाविरोधातील आंदाेलनात सहभागी होण्याचे आवाहन करतील. त्याचबरोबर मोहिमेचा भाग म्हणून सरपंच ते लोकसभा, राज्यसभा खासदारांना भेटून अभियानाला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.