दीपक मेटील
सडोली (खालसा) : वाशी (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम जागेअभावी रखडले असून, आरोग्य विभागाला गेली बारा वर्षे ‘कुणी जागा देता जागा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
वाशी, पीरवाडी, नंदवाळ, शेळकेवाडी या गावांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने वाशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले होते. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी लागणारी जागाच उपलब्ध झाली नसल्याने गेल्या बारा वर्षांपासून हा प्रश्न जैसे थे आहे. वाशी व शेजारील तीन गावांतील नागरिकांना आजारी पडल्यास कणेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. हे अंतर आठ ते दहा किलोमीटर असल्याने नागरिकांसाठी ते गैरसोयीचे ठरत आहे. वाशी व परिसरातील गावाची लोकसंख्या वाढल्याने याचा ताण कणेरीतील उपकेंद्रावर पडत आहे. त्यामुळे वाशीत बारा वर्षांपूर्वी आरोग्य केंद्रास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, जागाच न मिळाल्याने ते उभारण्यात अडचण आली.
चौकट
वाशीतील गावठाणमध्ये जागा शिल्लक नसल्याने गायरानमधील जागा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी द्यावी लागणार आहे. मात्र, गायरानाची जागा ही सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारीत आहे. ही जागा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे करण्याचा प्रस्ताव खर्चिक असला तरी लोकप्रतिनिधींनी यात लक्ष देऊन ही जागा आरोग्य केंद्रासाठी मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोट : वाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम गेली अनेक वर्षे रखडले असले तरी यासाठी सामाजिक वनीकरणाची जमीन घ्यावी लागणार असून हे खर्चिक असल्याने हे काम रेंगाळत पडले आहे. याचा पाठपुरावा करून प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावणार.
- गीता लोहार,
लोकनियुक्त सरपंच वाशी.
कोट : गेली कित्येक वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम जागेअभावी रखडल्याने सर्वसामान्यांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. आमदार पी. एन. पाटील यांच्या माध्यमातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार.
- उदयानीदेवी साळुंखे, संचालिका, के. डी. सी. सी. बँक