कोल्हापूर : सोळा वर्ष वयोमर्यादा ओलांडलेल्या जिल्ह्यातील अॅटो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र वाहतुक सेना व महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेतर्फे दाभोळकर कॉर्नर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काहीकाळ या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना काहीकाळ ताब्यात घेवून पोलीसांनी सोडले.राज्य शासनाने २९ डिसेंबर २०१८ ला एका निर्णयानूसार राज्यातील १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या अॅटोरिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो रिक्षाचालकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यात कोल्हापूरातील हजारो रिक्षाचालकांचा समावेश आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा.
या मागणीसाठी प्रथम वाहतुक सेना व रिक्षाचालक सेनेतर्फे जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यातील आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून शुक्रवारी दुपारी दाभोळकर कॉर्नर चौकात काही काळ रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी जोरदार घोषणा देत हा निर्णय त्वरीत रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान स्टेशनरोडवरील वाहतुक काहीकाळ कोलमडल्यामुळे वाहनधारकांना कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी आंदोलनकर्त्यांना समज देवून सोडून देण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व चालक सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जाधव, वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी केले. यात दिनेश परमार, दिलीप सुर्यवंशी, रमेश पोवार, विष्णूपंत पोवार, वसंत पाटील, योगेश रेळेकर, धनाजी यादव, अशोक जाधव, पुष्पक पाटील, जावेद शेख, भास्कर भोसले, काका मोहीते, संभाजी माने, दिनकर माने, संजय पाटील, विजय ओतारी, राज कापुसकर, सुनील मगदूम, सचिन पोवार, पप्पू गडदे आदींनी सहभाग घेतला.सत्तेत असलेल्या पक्षाच्या रिक्षा संघटनेने आंदोलन करून काहीकाळ वाहतुकीची कोंडी केली. याबद्दल अनेक वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी जर सत्तेत असलेल्या पक्षावरच ही वेळ येत असेल तर दुर्दैव असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.
कोल्हापूरातील दाभोळकर कॉर्नर चौकात महाराष्ट्र वाहतुक सेना व महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेतर्फे सोळा वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा स्क्रॅप करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी दुपारी रास्ता रोको केल्यामुळे काहीकाळ स्टेशनरोडवरील वाहतुक कोलमडली.