कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात चुका असल्यामुळे निर्धारित वेळत त्या दुरुस्त होणार नाहीत, म्हणून या याद्या रद्द कराव्यात आणि नव्याने याद्या तयार कराव्यात, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रारूप मतदार यादीतील अनेक चुका प्रशासक बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. केवळ दोन-चार नव्हे, तर सर्वच ८१ प्रभागांतील प्रारूप याद्यांत दोष आहेत. त्यामुळे त्या दुरुस्त होतील की नाही याबाबत आम्ही साशंक आहोत. त्यामुळे त्या रद्द करून नवीन याद्या तयार कराव्यात, अशी सूचना यावेळी केली. राज्य निवडणूक आयोगाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली आहे.अनेक याद्यांतील एक हजार ते दीड हजार नावे दुसऱ्या प्रभागाला जोडली गेली आहेत. बाजारगेट प्रभागातील ११०० मतदारांची नावे, सद्धार्थनगरातील ९५० मतदारांची नावे ही ट्रेझरी प्रभागात समाविष्ट केली असल्याने २२०० मतदार वाढले आहेत. जर प्रारूप मतदार याद्या रद्द करता येणे शक्य नसेल, तर हरकती घेण्यास तसेच त्या दुरुस्त करण्याचा कालावधी वाढवून द्या, अशी सूचनाही पोवार यांनी केली.ट्रेझरीतील नावे सुर्वेनगर प्रभागात-महाराणा प्रताप चौकात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ८० मतदारांची नावे प्रभाग नकाशाप्रमाणे ट्रेझरी प्रभागात असायला पाहिजेत; परंतु ही नावे या प्रभागापासून जवळपास सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सुर्वेनगर प्रभागाला जोडली गेली आहेत. गेले चार दिवस ही नावे कोठे गेली याची तपासणी करत असताना ती सोमवारी सुर्वेनगरला जोडल्याचे लक्षात आले. ही बाब गंभीर आणि याद्या बेजबाबदारपणे केल्याची साक्ष देणारी असल्याचे आर. के. पोवार यांनी सांगितले.करिअर बाद करण्याचा डावयाद्यांमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आले असून, अनेक माजी नगरसेवकांचे करिअर बाद करण्याचा डाव असल्याचा आक्षेप आदिल फरास यांनी घेतला. काही ठराविक लोकप्रतिनिधी प्रशासनाचे टार्गेट आहे की काय, अशी आम्हाला शंका येत असल्याचेही फरास म्हणाले. शिष्टमंळात आदील फरास, सचिन पाटील, सुनील देसाई, महेंद्र चव्हाण, निरंजन कदम, विनायक फाळके, रियाज कागदी, वहिदा मुजावर यांचा समावेश होता.
कमी वेळेत दुरुस्ती अशक्य असल्याने प्रारूप याद्या रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:50 AM
Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात चुका असल्यामुळे निर्धारित वेळत त्या दुरुस्त होणार नाहीत, म्हणून या याद्या रद्द कराव्यात आणि नव्याने याद्या तयार कराव्यात, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
ठळक मुद्देकमी वेळेत दुरुस्ती अशक्य असल्याने प्रारूप याद्या रद्द करा राष्ट्रवादीची प्रशासकाकडे मागणी : निवडणूक आयोगाकडेही तक्रार