कोल्हापूर : नियोजित सोलापूर-रत्नागिरी महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील, भुये, भुयेवाडी व शियेसह अन्य गावांतील शेतकरी भूमिहीन होणार असल्याने या रस्त्याला गावकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग-१६६ रस्त्याचे नियोजित चौपदरीकरण रद्द करण्यात यावे, अशी मागणी खासदार संजय मंडलिक व माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे केली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर विभागाच्यातीने सध्या सोलापूर-कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे नियोजन सुरू आहे. संस्थेने प्रस्तावित केलेल्या बायपास रोडमध्ये पडवळवाडी, केर्ले, केर्ली, कुशिरे, निगवे दुमाला, भुये, भुयेवाडी जठारवाडी, शिये गावांचा समावेश आहे. या परिसरात ऊस पीक मोठ्या प्रमाणात होते. शिवाय औद्योगिक वसाहत आहे. ते सगळे बाधित होणार असल्याने या गावांनी रस्त्याला विरोध केला आहे, तसे निवेदन चारशेहून अधिक ग्रामस्थांनी प्रशासनाला दिले.
कोल्हापूर शहराच्या नव्या विकास आराखड्यामध्ये रिंगरोड प्रस्तावित असून, त्यासाठी ३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूरमधून कोकणला जोडणारा वैभववाडी रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गाला पर्यायी बोरपाडळे, कोडोली, वारणानगर, वाठार ते हातकणंगले असा १०० फुटी राज्य मार्ग अस्तित्वात आहे. तरी रस्त्याचे चौपदरीकरण रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली.
---
३०० एकर जमीन
रस्ते प्रकल्पामुळे ४०० शेतकऱ्यांची सुमारे ३०० एकर सुपीक जमीन संपादीत होणार आहे. येथील शेतकरी अल्पभूधारक असून, ते भूमीहीन होणार आहेत. भरावामुळे शेतीत पाणी राहून खराब व नापीक होणार आहे. हा परिसर पूरबाधित होऊ शकतो.
-----
०६०९२०२१-कोल-हायवे निवेदन ०१
ओळ : सोलापूर-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सोमवारी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले. (छाया : नसीर अत्तार)
---
या चौपदरीकरणाला परिसरातील गावांचा विरोध असून, येथील नागरिक-शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
--