कोल्हापूर : शहरवासीयांवर लादण्यात येणारा अन्यायकारक घरफाळा आणि पाणीपट्टी दरवाढ प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, या मागणीसाठी शिवसेनेने महापालिकेसमोर सोमवारी सुमारे दीड तास धरणे आंदोलन केले.जनहिताचा विचार करून प्रस्तावित घरफाळा व पाणीपट्टी दरवाढ करणार नाही. याबाबत सर्व नगरसेवकांची लवकरच बैठक घेऊन सर्वसाधारण सभेत दरवाढीचा प्रस्ताव फेटाळू, असे आश्वासन महापौर हसिना फरास यांनी यावेळी दिले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी फरास यांना निवेदन दिले.कोल्हापूर महापालिकेने सन २०११-१२ पासून मालमत्ता कर (घरफाळा) हा भांडवली मूल्यावर आधारित करण्याचे ठरविले. प्रशासनाने या कामासाठी नियमावली तयार केली; परंतु, त्यास शासनाकडून मान्यता घेतली नाही. वास्तविक, बीपीएमसी ‘कलम ४५५’ प्रमाणे मान्यता घेणे अनिवार्य होते. महापालिकेचा घरफाळा एवढ्यावर न थांबता २७ एप्रिल २०१० ला शासनाच्या आदेशाला हरताळ फासत इमारतीचे भांडवली मूल्य ठरविण्यासाठी चटई क्षेत्र (एफएसआय) विचारात न घेता बांधीव क्षेत्र विचारात घेतले तसे करत असताना बांधीव क्षेत्र १.२ चटई क्षेत्र म्हणजेच २०० चौरस मीटर चटई क्षेत्र असलेल्या इमारतीचे बांधीव क्षेत्र २४० चौरस मीटर इतके होते. त्यामुळे सद्य:स्थितीत २० टक्के अधिक घरफाळा कर वसूल केला जात आहे.सन २०११ ते २०१६ पर्यंत तब्बल १८५ कोटी रुपये घरफाळा वसूल करण्यात आला. त्यापैकी म्हणजेच सुमारे ३८ कोटी रुपये इतका घरफाळा बेकायदेशीर व नियमबाह्ण पद्धतीने जप्तीची भीती दाखवून वसूल करण्यात आला. सर्वसामान्य जनतेकडून नियमबाह्ण पद्धतीने, कायद्याचा भंग करून, हुकूमशाहीने घरफाळा वसूल करणे आणि घरफाळा, पाणीपट्टी दरवाढ करणे अन्यायकारक आहे. गतवर्षी अशाच पद्धतीने घरफाळा वाढ करण्याचा डाव होता; पण, शिवसेनेला त्याला विरोध केला. त्यामुळे ही दरवाढ मागे घेतली. महापालिकेने प्रस्तावित केलेल्या घरफाळा आणि पाणीपट्टी दरवाढीस नगरसेवकांनी पाठिंबा देऊ नये. प्रशासनाने हुकूमशाहीने ही दरवाढ केल्यास येणाऱ्या सर्वसाधारण सभेदिवशी महापालिकेवर मोर्चा काढू तरी अन्यायकारक घरफाळा आणि पाणीपट्टी दरवाढ प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा.आंदोलनात उपशहरप्रमुख जयवंत हारूगले, रणजित जाधव, तुकाराम साळोखे, पूजा भोर, किशोर घाटगे, मंगल साळोखे, गजानन भुर्के, रमेश खाडे, महेश उत्तुरे, विशाल देवकुळे, राजू काझी, मुकुंद मोकाशी, पद्माकर कापसे आदींचा सहभाग होता. कोल्हापुरात सोमवारी शिवसेनेने महापालिकेसमोर प्रस्तावित घरफाळा व पाणीपट्टी दरवाढीविरोधात धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला महापौर हसिना फरास यांनी भेट दिल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी याबाबतचे निवेदन त्यांना दिले. यावेळी आदिल फरास, पूजा भोर, महेश उत्तुरे, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.
घरफाळा, पाणीपट्टीतील वाढ रद्द करा
By admin | Published: February 21, 2017 1:17 AM