कोल्हापूर : माझ्याविरुद्ध कारवाईची राज्य सरकारकडे केलेली शिफारस केवळ राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन केलेली असून, त्यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे. महापालिकेच्या सत्ता स्पर्धेत मला बकरा बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक महिला महापौर म्हणून माझ्याविरुद्ध हीन दर्जाचे कारस्थान केले आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या कृत्याची दखल न घेता ही शिफारस ताबडतोब रद्द करावी, अशी विनंती महापौर तृप्ती माळवी यांनी नगरविकास विभागाचे सहसचिव यांच्याकडे केली आहे. महापौर माळवी यांनी नगरविकास विभागाच्या नोटिसीला उत्तर देताना पाच पानांचा विस्तृत खुलासा दिला आहे. या खुलाशात तशी विनंती केली आहे. महापौरांनी या पत्रात पुढे म्हटले आहे की, ‘महापालिकेच्या राजकारणातून आपणास बदनाम करण्यात येत आहे. महापौरपदाचा राजीनामा द्यावा म्हणून आपल्यावर दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी दबाव आणला. मी राजीनामा देत नाही म्हटल्यावर माझ्याविरुद्ध द्वेषभावना निर्माण केली गेली. काही व्यक्ती तर सूडभावनेने माझी बदनामी करायला लागले. तरीही मी घाबरले नाही. म्हणून माझ्याविरुद्ध शक्य तितक्या बेकायदेशीर मार्गांचा अवलंब केला. ‘लाचलुचपत’ खात्याकडे खोटी तकार करून मला त्यात गोवण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई प्रलंबित आहे. न्यायालयाने मला दोषी ठरवून शिक्षा सुनावलेली नाही. त्यामुळे मी लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झालेले नाही.’ कोणताही आरोप सिद्ध झाला नसताना माझ्याविरुद्ध कारवाई झाल्यास माझ्यावर फार मोठा कलंक लागणार आहे. हा कलंक माझ्या सार्वजनिक जीवनावर परिणाम करणारा असेल. कारवाईचे माझ्यावर दुरगामी परिणाम होणार आहेत. तरी पुराव्याशिवाय व योग्य कारणाशिवाय कारवाई करणे अपेक्षित नाही. काही व्यक्ती केवळ हुकूमशाहीच्या जोरावर मला माझ्या न्यायहक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ते हाणून पाडणे आवश्यक आहे. म्हणूनच महासभेने केलेला ठराव खारीज करण्यात यावा, असे महापौरांनी या पत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी) माझ्यावरील कारवाईचा प्रस्ताव राजकीय द्वेषातूनमहापौरपदाचा राजीनामा द्यावा म्हणून आपल्यावर दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी दबावलाचप्रकरणी न्यायालयाने मला दोषी ठरवून शिक्षा सुनावलेली नाही.
कारवाईचा प्रस्ताव रद्द करा
By admin | Published: May 18, 2015 11:40 PM