गडहिंग्लज शहरातील नगरपालिका हद्दीतील भीमनगर ते दड्डी ऑईल मिलपर्यंतचा ९ मीटर रुंदीचा रस्ता रद्द करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, १९७९ मध्ये नगरपालिकेतर्फे मागासवर्गीय नागरिकांना प्लॉट देऊन घरे बांधून देण्यात आली आहेत. ३८ वर्षांपूर्वी बांधलेली घरे जीर्ण होऊन मोडकळीस आली आहेत. त्यामुळे संबंधितांनी रमाई आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला आहे. १२ प्लॉटधारकांपैकी ५ प्लॉटधारकांना अनुदान मंजूर झाले आहे.
दरम्यान, २०१५ मध्ये गडहिंग्लज शहराची दुसरी सुधारित विकास योजना मंजूर झाली. सुधारित विकास आराखड्यामध्ये पालिकेने प्लॉटधारकांच्या जागेवर ९ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित केला आहे. प्रशासनाने लेखी पत्राने प्लॉट दिले असून त्या जागेवर रस्ता आरक्षित करणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित प्लॉटधारकांना प्लॉट नावे करून देण्यासाठी तशी भूमी अभिलेखकडे नोंद करण्याबाबत पालिकेने ठराव करावा आणि प्लॉटधारकांना न्याय द्यावा.
निवेदनावर, हारुण सय्यद, दीपक कुराडे, सावित्री पाटील, रेश्मा कांबळे, शुभदा पाटील, रूपाली परीट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.