कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रातील स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने औद्योगिक आणि व्यावसायिक विजेचा स्थिर आकार स्थगित नको, तर रद्द करावा. उद्योग, कारखाने सुरू करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे, नियमावली राज्य सरकारने लवकर स्पष्ट करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली.
येथील अजिंक्यतारा कार्यालयात उद्योजकांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. औद्योगिक विजेचा स्थिर आकार पुढील तीन महिने स्थगित केला आहे. मात्र, तीन महिन्यानंतर त्याची वसुली होणार आहे. औद्योगिक क्षेत्राची सद्य:स्थिती लक्षात घेऊन हा स्थिर आकार रद्द करावा. उत्तरप्रदेश, गोवा, आदी राज्यांनी उद्योग, कारखाने सुरू करण्याची मार्गदर्शक तत्त्वे, नियमावली जाहीर केली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केली. विजेच्या वापरा इतक्या बिलाची आकारणी करावी. कोल्हापूर हे कोरोनाबाबतच्या आॅरेंज झोनमध्ये असल्याने उद्योग सुरू करण्याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण मिळावे, अशी मागणी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी केली.
बांधकाम व्यवसायातून जमा झालेला लेबर सेसमधील निधीतून असंघटित क्षेत्रातील कामगार, मजुरांना मदत करावी, अशी मागणी ‘कोल्हापूर चेंबर’चे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी केली. आमदार जाधव यांनी उद्योजकांच्या मागण्या मांडल्या. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी तातडीने उद्योग सचिवांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. उद्योजकांनी केलेल्या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. कारखाने सुरू करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे, नियमावली निश्चितीबाबत उद्योग विभागासमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. उद्योग विभागाकडून संबंधित नियमावली, मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि उद्योजकांची एकत्रित बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी ‘गोशिमा’चे अध्यक्ष सचिन शिरगावकर, उद्योजक रणजित शहा, शीतल केटकाळे, आदी उपस्थित होते.कामगारांच्या पगाराबाबत मदत व्हावीकामगारांच्या एप्रिलमधील पगारातील २५-३० टक्के रक्कम आम्हाला देणे शक्य आहे. उर्वरित रकमेसाठी ईएसआयसी, प्रोफेशनल टॅक्स आणि राज्य शासनाकडून मदत व्हावी, अशी मागणी संजय शेटे यांनी यावेळी केली.