कोल्हापूर : दर्शन शहा खून प्रकरणातील संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे याची ‘नार्को टेस्ट’ घेण्याबाबतची मागणी पूर्णत: बेकायदेशीर आहे. ‘नार्को टेस्ट’चा निर्णय हा कायद्याने पुरावा होऊ शकत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. आरोपीने खटल्याची सुनावणी लांबणीवर पडावी व साक्षीदारांवर दडपण आणून त्यांना फोडावे, या अप्रामाणिक हेतूने ‘नार्को टेस्ट’ची मागणी केली आहे. म्हणून हा अर्ज रद्द करण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केली़ याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. मुळे यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाल़ी़ आरोपी चांदणेची ‘नार्को टेस्ट’ करायची की नाही, याबाबतचा निर्णय बुधवारी न्यायालय देण्याची शक्यता आहे. शाळकरी मुलगा दर्शन शहा खून प्रकरणाच्या सुनावणीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. मुळे यांच्या न्यायालयात सोमवारपासून सुरुवात झाली. संशयित आरोपी योगेश चांदणे याच्या नार्को तपासणीसंदर्भात विशेष सरकारी वकील निकम यांनी खुलासा सादर केला. नार्को टेस्टच्या निर्णयावर गुन्हेगार दोषी अगर निर्दोष आहे हे देखील कायद्याने ठरविता येत नाही. पोलीस तपासात आरोपी ज्यावेळी निष्पन्न होत नाही व तपासाची सूई ज्यावेळी संशयित व्यक्तीविरुद्ध असते, त्यावेळी आरोपीच्या खात्रीसाठी व तपासाची दिशा ठरविण्यासाठी तपास यंत्रणा संशयित व्यक्तीची नार्को टेस्ट घेण्याची मागणी करत असते. या खटल्यात तपास यंत्रणेला आरोपीविरुद्ध भरपूर पुरावे उपलब्ध झाले असून ते न्यायालयात दाखल केले आहेत. त्यामुळेच आरोपीचा जामिनाचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीविरुद्धचा पुरावा स्पष्टपणे आरोपीनेच गुन्हा केलेला आहे हे दर्शवितो, त्यामुळे आरोपीचे म्हणणे की, त्याची नार्को टेस्ट ही त्याचे निर्दोषत्व सिद्ध करेल हे पूर्णत: चुकीचे, लबाडीचे व खोटे आहे. आरोपीची नार्को टेस्टची मागणी अवाजवी असल्याने ती फेटाळावी. आरोपीने खटल्याची सुनावणी लांबणीवर पडावी व साक्षीदारांवर दडपण आणून त्यांना फोडावे या अप्रामाणिक हेतूने नार्को टेस्टची मागणी केली आहे. खटल्याची सुनावणी ही २० जानेवारीला ठेवली होती. त्यावेळी न्यायालयात ११ साक्षीदार हजर होते. धैर्यशील पाटील हा साक्ष देण्यासाठी हजर असताना त्यास आरोपीने न्यायालयात साक्ष दिल्यास मारण्याची धमकी दिली होती. ही घटना त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. याप्रकरणी साक्षीदाराने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर खटल्याची सुनावणी ही तातडीने संपवावी, असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर ही आरोपी हेतूपरस्पर खटल्याच्या सुनावणीचे कामकाज लांबवत असल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चांदणेचा ‘नार्को टेस्ट’चा अर्ज रद्द करावा
By admin | Published: February 11, 2015 12:28 AM