कोल्हापूर : कॅन्सरच्या रुग्णांनी निराश न होता या रोगाच्या प्रतिबंधाच्या उपचाराची तयारी ठेवावी. जेणेकरून या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन दरवर्षी एक कॅन्सर हॉस्पिटल बंद होईल, असे प्रतिपादन बंगलोरयेथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. आशुतोष पाटील यांनी गुरुवारी येथे केले. तर पिकात वारेमाप कीटकनाशके फवारल्याने लोकांना कॅन्सरला सामोरे जावे लागत आहे, यासाठी शेतकºयांना दोषी धरणे अयोग्य आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था, शिरोळतर्फे शाहू स्मारक भवनात ‘लढा कॅन्सरशी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजू शेट्टी होते. यावेळी लातूरचे पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर, नाशिकचे कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर, रायचूरच्या कृषी विद्यापीठाचे डॉ. भीमाण्णा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, आदींची उपस्थिती होती.
डॉ. पाटील म्हणाले, शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होऊन इतर घटकांना इजा पोहोचविणे म्हणजे कॅन्सर होय. पोट, स्तन, गर्भाशय, अंडाशय असे कॅन्सरचे प्रकार आहेत. गर्भाशयातील कॅन्सरमध्ये भारत जगात तिसºया क्रमांकावर आहे. या आजारावर सर्जरी, केमोथेरपी व रेडीएशन थेरपीद्वारे उपचार केले जातात. या आजाराची लक्षणे आढळल्यावर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधल्यास तो आटोक्यात आणणे शक्य आहे.
खा. शेट्टी म्हणाले, शेतकरी हा अन्नदाता असून, तो विषाची शेती करायला बसलेला नाही. जे पिकवितो त्यातीलच तो स्वत:ही खातो; त्यामुळे दुसºया कुणाच्या आरोग्याशी खेळून कुणावर सूड उगवायचा त्याचा हेतू नाही. हे समजून घेण्याची गरज आहे. कॅन्सरसाठी निव्वळ शेतकºयांना दोषी धरण्यापेक्षा नद्यांमध्ये ज्या औद्योगिक कंपन्यांमधून प्रदूषणकारी घटक मिसळतात, त्यांनाही तितकेच जबाबदार धरले पाहिजे.
देऊळगावकर म्हणाले, कॅन्सरची ही स्थानिक समस्या नसून, ती राष्टÑीय समस्या आहे; त्यामुळे सर्वांनी याबाबत काळजी घेतली पाहिजे. हवामान बिघडत चालले असून पुढील पिढीला आपण स्वच्छ पाणी व हवा न देता नुसता बॅँक बॅलेन्स देऊन उपयोग काय?डॉ. भीमाण्णा म्हणाले, शिरोळ परिसरातील नदीचे पाणी, भाजीपाला, फळभाज्यांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासून पृथक्करण केले. यामध्ये अरसेनिक व लेड यासारखे जड धातू आणि पायरोथ्राइडस व आॅरगॅनोफोस्फो कंपाऊंडस्सारख्या पेस्टीसाईडस्चे अंश आढळले आहेत. हे मानवी आरोग्यास घातक आहे. भगवान काटे यांनी स्वागत केले. डॉ. महावीर अक्कोळे यांनी प्रास्ताविक केले. खा. राजू शेट्टी यांनी आभार मानले.दीर्घकालीन उपाय गरजेचे : भास्करकॅन्सरसाठी कारणीभूत असलेल्या सर्व बाजूंचा ऊहापोह होऊन सत्य बाहेर आले पाहिजे, त्याचबरोबर दीर्घकालीन उपाय कोणते, हे पाहून त्याची अंमलबजावणी गरजेची असल्याचे प्रतिपादन भास्कर यांनी केले.
कॅन्सर ही राष्टय समस्या : अक्कोळेकॅन्सर ही समस्या फक्त शिरोळपुरती नसून, सर्व बागायती क्षेत्र व पीक-पाण्याची आहे. याकडे प्रादेशिक दृष्टिकोनातून न पाहता, राष्टÑीय समस्या म्हणून पाहणे गरजेचे आहे, असे डॉ. महावीर अक्कोळे यांनी सांगितले.
परदेशात प्रिस्क्रिप्शनशिवाय खते मिळत नाहीतखते व कीटकनाशकांचे अंश पाणी व मातीमध्ये मिसळत आहेत; त्यामुळे यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. परदेशात प्रिस्किप्शनशिवाय कुणालाही खते विक्री केली जात नाहीत, असे डॉ. देऊळगावकर यांनी सांगितले.
‘कॅन्सर’प्रश्नी प्रबोधन मौलिक : वसंत भोसलेकॅन्सरसारख्या गहन प्रश्नांची उत्तरे अजूनही पूर्णपणे मिळाली आहेत, असे म्हणता येणार नाही; परंतु याच्या प्रबोधनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला पुढाकार हा मौलिक व महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी गुरुवारी येथे केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था, शिरोळतर्फे शाहू स्मारक भवनात ‘लढा कॅन्सरशी’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. यावेळी दै. ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार, दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक श्रीराम पचिंद्रे, दै. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
वसंत भोसले म्हणाले, कॅन्सरच्या प्रबोधनासाठी आपल्याला दिशा ठरवावी लागेल; कारण नद्यांमधील पाणी हे प्राणीमात्रासाठीच नव्हे, तर पिकांनाही वापरण्यास अयोग्य आहे. त्यामुळे कॅन्सरसारखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्या पाण्याप्रती आपला व्यवहारही आपण तपासला पाहिजे; कारण त्याच्या प्रदूषणासाठी आपणच कारणीभूत आहोत. तसेच नदी प्रदूषणमुक्त करण्याऐवजी दुसरीकडून थेट पाणी आणण्याची योजना करून गावाशेजारील नदी अधिक प्रदूषित करण्याचे काम आपणच करीत आहोत, हेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
२४ नद्यांमधील प्रदूषित पाणी शिरोळ परिसरात येऊन प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासाठी ‘स्वाभिमानी’ने उचललेले पाऊल योग्य आहे. संघटनेने चळवळीच्या माध्यमातून शेतकºयांना समृद्ध करण्याचे काम केले असून त्यांनी आता त्यांच्या आरोग्यसमृद्धीकडेही वळले पाहिजे. श्रीराम पवार म्हणाले, पंजाबमध्ये हरितक्रांती होऊन नवतंत्रज्ञान मिळाले; परंतु त्याचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले गेले नसल्याने कॅन्सरसारखी परिस्थिती निर्माण झाली.
श्रीराम पचिंद्रे म्हणाले, नद्यांच्या पाणी प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे प्रदूषण औद्योगिक वसाहतींमधून होत असून त्यांच्यावर निर्बंध आणायला हवेत. विजय जाधव म्हणाले, कॅन्सर हा प्रश्न फक्त शिरोळ तालुक्यापुरता मर्यादित नसून सर्व तालुक्यांमध्ये याचा सर्व्हे होण्याची गरज आहे. यावेळी कॅन्सरमधून बºया झालेल्या आसावरी जमदग्नी (कुरुंदवाड), डॉ. वर्षा अक्कोळे (जयसिंगपूर) यांच्यासह मोहन मनावरकर यांनी मनोगत व्यक्त केले.