संदीप खवळे- कोल्हापूर -महाराष्ट्र सरकारने कर्करोगावरील उपचारासाठीच्या औषधांना मूल्यवर्धित करातून सवलत दिली आहे. या कर सवलतीमुळे कर्करोगावरील विविध औषधांच्या किमतींमध्ये पाच टक्क्यांची घट होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्करोगाने त्रस्त झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कर्करुग्णांचे प्रमाण चिंताजनक आहे. एकट्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये दरवर्षी कर्करोगाचे सुमारे अडीच हजार नवीन रुग्ण आढळून येतात. यातील पन्नास टक्के रुग्ण तोंडाच्या आणि घशाच्या कर्करोगाने त्रस्त असल्याचे आढळून येते. याशिवाय स्तनांचे, गर्भाशयाचे, जठराचे आणि स्वादुपिंडाचे कर्करोग होण्याचे प्रमाणही वाढत आहे. कर्करोगाच्या रुग्णावर उपचारांसाठी प्रामुख्याने पॅक्लिटॅक्सेल, इमॅटिमिब, हरसेप्टिन ही औषधे वापरली जातात. यातील पॅक्लिटॅक्सेल, इमॅटिमिब औषधांची किंमत प्रतिमहिना अनुक्रमे तीन ते चार हजार व पाच हजार आहे. रुग्णाला या औषधांचे साधारणत: सहा डोस द्यावे लागतात. या औषधांच्या किमती जास्त होत्या; पण औषध किंमत नियंत्रण कायद्यानुसार या किमती कमी करण्यात आल्या. मूल्यवर्धित करातून या औषधांना सवलत मिळाल्यामुळे ही औषधे आणखी स्वस्त होतील, अशी माहिती कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सूरज पवार यांनी दिली. डॉ. पवार म्हणाले, स्तनांच्या कर्करुग्णावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हरसेप्टिन या औषधाच्या एका डोसची किंमत सुमारे ५० ते ६० हजार आहे. स्तनांच्या कर्करुग्णासाठी या औषधांचे १२ ते १८ डोस द्यावे लागतात. हा खर्च सहा लाखांच्या घरात जातो. कर सवलतीमुळे स्तनांच्या कर्करुग्णाच्या उपचार खर्चात बरीच कपात होईल. तोंडाच्या रुग्णांची संख्या चिंताजनक एकूणच कर्करुग्ण संख्येपैकी तोंडाच्या कर्करोगाची संख्या जास्त आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते सेवन याला कारणीभूत आहे. ग्लोबल अडल्ट टोबॅको (गॅटस)च्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील २.६ कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. यांतील २.३ कोटी लोक तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. भारतातील १३ ते १५ वर्षे या दरम्यानच्या वयोगटातील ५५०० मुले रोज तंबाखूचे सेवन करतात. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू उत्पादने सहजपणे उपलब्ध असल्याचा हा परिणाम आहे. तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा)मध्ये तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थांच्या हमीची तरतूद आहे. याची अंमलबजावणी आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये विविध कर्करोगांशी संबंधित औषधांचा साठा पुरेसा आहे. औषधांवर पाच टक्के मूल्यवर्धित कर आकारला जातो. कर्करोगावरील औषधांच्या किमती आठ हजारांपासून तीन-चार लाख रुपयांपर्यंत आहेत. महाराष्ट्र सरकारने कर्करोगावरील उपचाराच्या औषधांना मूल्यवर्धित करातून सवलत दिल्यामुळे या औषधांच्या किमती पाच टक्क्यांनी कमी होतील. करसवलतीबाबत अधिसूचना निघाल्यानंतर सवलतीच्या दरामधील औषधे रुग्णांना मिळतील.- मदन पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा केमिस्टस असोसिएशन
मूल्यवर्धित कर सवलतीने कर्करोगाची औषधे होणार स्वस्त
By admin | Published: August 05, 2015 12:05 AM