कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेससमोर उमेदवारीचा पेच, लोकसभेप्रमाणे सरप्राईज देणार का?
By विश्वास पाटील | Published: July 11, 2024 01:12 PM2024-07-11T13:12:48+5:302024-07-11T13:13:13+5:30
महायुतीतही संभ्रमच..
विश्वास पाटील
कोल्हापूर : विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण हे कोडेच आहे. या पक्षापुढे सक्षम उमेदवारीचा पेच तयार झाला आहे. आमदार जयश्री जाधव, मालोजीराजे किंवा मधुरिमाराजे, सचिन चव्हाण ही नावे पक्षासमोर आहेत. परंतु आता शाहू छत्रपती खासदार झाल्यामुळे छत्रपती घराण्यातील उमेदवार पुन्हा विधानसभेला रिंगणात उतरेल याची शक्यता फारच धूसर आहे.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत चंद्रकांत जाधव हे साधा सरळ माणूस ही सकारात्मक बाजू आणि विरोधी उमेदवाराबद्दल तयार झालेल्या नकारात्मक वातावरणाच्या लाटेवर स्वार होऊन पहिल्याच प्रयत्नात विजयी झाले. परंतु दुर्दैवाने त्यांना फार काळ शहराचे प्रतिनिधित्व करता आले नाही. त्यांचे नोव्हेंबर २०२१ मध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे आणि महाविकास आघाडीची एकत्रित ताकद लागल्याने त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या चुरशीच्या लढतीत निवडून आल्या व कोल्हापूर शहरातून पहिल्या महिला आमदार झाल्या. आमदार म्हणून त्या लोकसंपर्कात आहेत. विकासकामांचाही पाठपुरावा करत आहेत परंतु आगामी विधानसभा निवडणूक तेवढ्यावरच भागणारी नाही. लोकसभेला ज्या प्रकारच्या जोडण्या लागल्या, आर्थिक ताकद वापरली गेली हे पाहता विधानसभा त्याच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे त्या पातळीवर लढताना त्यांच्या मर्यादा येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा विचार होण्याबाबत साशंकताच जास्त आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे सक्षम उमेदवार म्हणून माजी आमदार मालोजीराजे किंवा मधुरिमाराजे यांचे नाव चर्चेत येत आहे. परंतु गेल्या निवडणुकीतही त्यांच्यापैकी कुणी प्रत्यक्षात रिंगणात उतरले नाही. लोकसभेला शाहू छत्रपती रिंगणात उतरले आणि कोल्हापूरकरांनी त्यांना विजयी केले. त्यामुळे आता पुन्हा छत्रपती घराण्यातीलच उमेदवार रिंगणात येण्याची शक्यता धूसर वाटते. माजी आमदार मालोजीराजे यांचा ३ जुलैला वाढदिवस झाला परंतु त्यांनीही तो अत्यंत साधेपणाने साजरा केला. ते स्वत: किंवा मधुरिमाराजे यापैकी कोणीही रिंगणात उतरणार असते तर त्यांना या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाची संधी होती. परंतु तसे काही घडलेले नाही.
पक्षाचे शहराध्यक्ष असलेले सचिन चव्हाण हा एक पर्याय आहे. परंतु त्यांनी अजून शहरात काम करण्याची गरज आहे. त्यांचे सध्याचे राजकारण महापालिकेपुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे काँग्रेसला नवीनच उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. तो सध्यातरी समोर कोण दिसत नाही. लोकसभेप्रमाणे काँग्रेस विधानसभेलाही सरप्राईज देणार काय हीच उत्कंठा असेल.
महायुतीतही संभ्रमच..
काँग्रेसपुढे उमेदवारीचा पेच असताना महायुतीतही ही जागा नक्की कुणाच्या वाट्याला जाणार यावरून रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून अनेकांनी हाकारे घालायला सुरुवात केली असताना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही रणशिंग फुंकले आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी, संपर्क दौराही त्यांनी सुरू केला आहे. काही झाले तरी ही जागा शिंदेसेना सोडणार नाही असा दावा त्यांच्या गटाकडून केला जात आहे. त्यामुळे जागा कोणत्या पक्षाला जाते, उमेदवार कोण आणि मग महायुतीतील इतर पक्षाच्या उमेदावारी भूमिका काय यावर लढत कशी होणार हे स्पष्ट होईल.
महाविकास आघाडीतही दावे प्रतिदावे..
महाविकास आघाडीतून या जागेवर उद्धवसेना व राष्ट्रवादी शरद पवार गटानेही दावा सांगितला आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, ही जागा आम्हाला सोडा अशी त्यांची मांडणी आहे. पण जागा वाटपात विद्यमान आमदार कोणत्या पक्षाचा आहे हाच निकष महत्त्वाचा मानला जातो.