लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची शुक्रवारी चार वाजता शासकीय विश्रामगृहावर बैठक होणार आहे. याचवेळी राष्ट्रवादी, राष्ट्रीय काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनाही बोलावले आहे. आमदार पी. एन. पाटील हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आज (शुक्रवारी) निश्चित होण्याची शक्यता आहे. या निवडी सोमवारी (१२ जुलै)ला आहेत. महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने कोणताही चमत्कार होण्याची शक्यता नाही.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्ष राष्ट्रवादीचा होईल, अशी घोषणा केली असली तरी काॅंग्रेस या पदावरचा हक्क सहजासहजी सोडेल, असे वाटत नाही, असे काॅंग्रेसच्या सदस्यांचे मत आहे. अशातच आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी नेत्यांबरोबरच सदस्यांनाही भेटण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. त्यामुळे राहुल पाटील यांचे नाव शेवटपर्यंत चर्चेत राहणार आहे. आपण स्वत: ग्रामविकास मंत्री असल्यामुळे आपल्याच तालुक्यात युवराज पाटील यांना अध्यक्षपद मिळावे, यासाठी मुश्रीफ आग्रही आहेत. मुश्रीफ, सतेज पाटील एकत्र येणार असल्याने नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले तर युवराज पाटील यांचे नाव निश्चित मानले जाते. मुश्रीफ जो निर्णय घेतील तो अंतिम अशी त्यांची स्थिती आहे.
चौकट
समन्वयासाठी संधी
‘गोकुळ’च्या निवडणुकीमुळे सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला. परंतु, सतेज पाटील यांनीच काॅंग्रेस कार्यालयात आम्ही एकत्रच आहोत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सतेज पाटील समन्वयाची भूमिका घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकदा घोषणा केल्यानंतर मुश्रीफ एक पाय मागे घेणार का, अशीही विचारणा केली जात आहे.
चौकट
जिल्हा परिषदेतील बलाबल
मतदानासाठी पात्र सदस्य : ६५
सत्तारूढ महाविकास आघाडी
काॅंग्रेस १३
राष्ट्रवादी ११
शिवसेना १०
आबिटकर यांची शाहू आघाडी ०२
युवक आघाडी चंदगड ०२
स्वाभिमानी ०२
ताराराणी आघाडी ०१
अपक्ष ०१
एकूण ४२
चौकट
विरोधी भाजप व मित्रपक्ष
भाजप १३
जनसुराज्य ०६
ताराराणी आघाडी ०२
आवाडे गट ०२
एकूण २३