कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादिवशी आज, मंगळवारी ७ मे रोजी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात चुरसीने मतदान सुरु आहे. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी आणि राजकीय नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क सकाळच्या टप्प्यातच मतदान करुन पार पाडला.कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांनी आणि छत्रपती घराण्याने रमणमळा परिसरातील न्यू पॅलेसजवळील शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. याज्ञसेनीराजे, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशराजे, यशस्विनीराजे यांनी मतदान केले. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी सहकुटूंब कागल तालुक्यातील चिमगाव येथील मतदान केंद्रात मतदान केले. यावेळी वैशाली मंडलिक, वीरेंद्र मंडलिक यांनीही मतदान केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथे मतदान केले. खासदार धनंजय महाडिक आणि परिवाराने कोल्हापुरात शाहू मार्केट यार्ड परिसरातील शेतकरी संघाच्या इमारतीत मतदान केले. अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांनी करवीर तालुक्यातील सांगरुळ येथे मतदान केले.तर माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा येथील पॅव्हेलियन येथील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी कागल तालुक्यातील व्हनाळी येथे मतदान केले. आमदार जयश्री जाधव आर्यर्विन ख्रिश्चन येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत त्यांच्या सासूबाई प्रेमला पंडितराव जाधव यांनीही वयाच्या ९३ वर्षी मतदानाचा हक्क बजावला.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी सकाळीच हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील मतदान केंद्रात तर उध्दव सेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांनी शाहुवाडी तालुक्यातील सरुड येथे मतदान केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ मतदारसंघात मतदान केले. तत्पर्वी त्यांनी त्यांच्या ९८ वर्षांच्या वृध्द आईचा आशिर्वाद घेतला.
कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुणी कुठे केले मतदान.. जाणून घ्या
By संदीप आडनाईक | Published: May 07, 2024 1:17 PM