कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात ज्यांची ताकद आहे त्यांना तो सोडण्यात येईलच, पण महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील उमेदवारही प्राप्त परिस्थितीनुसार एकमेकांना दिले जातील, असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी अनेक जागांवर अदलाबदल होण्याचे संकेत सोमवारी पत्रकार परिषदेत दिले. पाटील यांच्या या वक्तव्याने राधानगरी, इचलकरंजी, शिरोळ व चंदगड विधानसभा मतदारसंघात जागांबरोबर उमेदवारांच्या पक्ष बदलणार असल्याच्या चर्चांना पुष्टी मिळाली.आमदार पाटील म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये सर्वांना न्याय देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरात काही ठिकाणी जागांची व गरज भासल्यास उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते. जी जागा आमच्याकडे येईल तेथे इतर घटक पक्षातील चांगला उमेदवारही आमच्याकडे येऊ शकेल. जी जागा दुसऱ्या पक्षाला जाईल तिथे आमचा उमेदवारही त्या पक्षाचा होऊ शकेल.
येत्या शुक्रवारपासून राज्यातील मोठे नेते कोल्हापुरात असल्याने काँग्रेसमध्ये इनकमिंग होणार का? या प्रश्नावर काँग्रेस आधीच हाउसफुल आहे, मात्र, येणाऱ्याचे स्वागतच असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
बैठकीत जाहीर मागणी केली, पण..मुंबईत सोमवारी झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला किती जागा हव्यात, किती जागा लढवायच्या आहेत याची जाहीर मागणी केली आहे. मात्र, महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढताना सर्वच पक्षांना न्याय देऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
ही जागा घ्या, ती द्या'ही जागा घ्या अन् ती द्या' असे अनेक मतदारसंघ राज्यात आहेत, असे सांगत आमदार पाटील यांनी जिल्ह्यातील काही मतदारसंघात फेरबदलाचे संकेत दिले.