कोल्हापूर : चंदगड, राधानगरी, कागल विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या लेख्यांची तपासणी खर्च निरीक्षक शील आशिष यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १०) होणार आहे, अशी माहिती निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी संजय राजमाने यांनी दिली.राजमाने म्हणाले, ‘पहिली तपासणी गुरुवारी (दि. १०), दुसरी तपासणी सोमवारी (दि. १४) व तिसरी तपासणी १८ आॅक्टोबरला संबंधित विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर होणार आहे. या तपासणीकरिता सर्व संबंधित उमेदवारांनी त्यांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवह्या आणि प्रमाणकांच्या छायाप्रती तसेच बॅँक पासबुकची छायाप्रत, तसेच आवश्यक कागदपत्रे घेऊन उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने ओळखपत्रासह उपस्थित राहावे.ते पुढे म्हणाले, ‘वेळापत्रकानुसार उमेदवारांनी त्यांचे लेखे तपासणीसाठी सादर केले नसल्यास लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील कलम ७७ नुसार उमेदवारांनी त्यांच्या दैनंदिन खर्चाचे लेखे जतन केलेले नाहीत, असे मानण्यात येईल. लेखे सादर न केल्यास न्यायालयात तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच उमेदवारांना दिलेल्या प्रचार वाहनांचे परवानेही रद्द करण्यात येतील.