लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार हा अखेरचा दिवस असल्याने एकच गर्दी उसळली होती. विहीत वेळेत सर्व कागदपत्रांसह मुहूर्तावर अर्ज दाखल करताना उमेदवारांसह स्थानिक नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसले.
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींसाठी गेले आठ दिवस उमेदवारी अर्ज दाखल केले जात होते. मध्यंतरी तीन दिवस सलग सुट्टी आल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती. त्यात ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरून त्याच्या प्रतीसह आवश्यक कागदपत्रांचा संच जोडावा लागत असल्याने इच्छुकांची डोकेदुखी वाढली होती. सर्व्हर डाऊन होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा दिली होती. त्यानुसार बुधवारी अर्ज स्वीकारले गेले. शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच इच्छुकांची धांदल उडाली होती. ऑफलाईन अर्ज भरण्याची सोय केली असली, तरी कागदपत्रांचा संच तेवढाच जोडावा लागत असल्याने प्रक्रियेला उशीर होत होता. अर्ज दाखल करण्यासाठी वेळ वाढवून दिली असली, तरी शेवटच्या क्षणापर्यंत गर्दी होती. अनेक महिला लहान मुलांना घेऊन सकाळपासूनच बसून होत्या.
अगोदर अर्ज मग पॅनेल
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आला तरी अनेक गावांमध्ये स्थानिक आघाड्यांत एकमत झालेले नाही. त्यामुळे अगोदर अर्ज दाखल करायचे आणि मग जागांचे वाटप करून पॅनेल तयार करण्याची व्यूहरचना अनेकांनी केली आहे.
छाननीच्या भीतीने ‘डमी’ अर्ज
उमेदवारी अर्जात काही त्रुटी असल्याने छाननीवेळी विरोधक आक्षेप घेणार, या भीतीने त्याच व्यक्तीचा दुबार अर्ज भरण्यात आला. उमेदवाराचा अर्ज छाननीत अवैध ठरला तरी डमी अर्ज भरल्याने उमेदवारी अर्जांची संख्या जास्त दिसत आहे. विशेषत: राखीव गटात हे प्रमाण अधिक आहे.
छाननीत काढण्यासाठी कुंडल्या तयार
छोट्या-छोट्या गावात कमालीची राजकीय इर्ष्या आहे. एकमेकांचा अर्ज अवैध ठरविण्यासाठी जोडण्या लावल्या आहेत. आज (गुरुवारी) माघार असल्याने थकबाकी, अतिक्रमण, जातीचे दाखले, गुन्हे आदी कुंडल्या काढून ठेवल्या आहेत.
अशी राहणार पुढील प्रक्रिया-
उमेदवारी अर्जांची छाननी - ३१ डिसेंबर
माघार व चिन्हे वाटप - ४ जानेवारी
मतदान - १५ जानेवारी
मतमोजणी - १८ जानेवारी