कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची घोषणा अजून बाकी असल्याने याविषयीचे औत्सुक्य वाढले आहे. दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी आपल्या उमेदवारीला कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. ते मुंबईतच असून गुरुवारी कोल्हापुरात येणार आहेत.महायुतीच्या उमेदवारीसाठी भाजपही आग्रही असल्याचे चित्र निर्माण झाले असताना सत्यजीत कदम आणि कृष्णराज महाडिक यांची नावे चर्चेत आहेत. खासदार धनंजय महाडिकही दोन दिवस मुंबईतच होतेे. त्यामुळे या चर्चेत भर पडली, तर एकीकडे शिंदेसेनेकडून प्रकाश आबिटकर आणि चंद्रदीप नरके यांची उमेदवारी जाहीर झाली; परंतु क्षीरसागर यांचे नाव जाहीर झालेले नाही. त्यामुळे ‘उत्तर’च्या उमेदवारीचा गुंता वाढला आहे.काँग्रेस कोण उमेदवार देते यावरून महायुतीचा उमेदवार निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. भाजपने या मतदारसंघासाठी केलेला सर्व्हे आधार धरून उमेदवारी निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने ती जाहीर होण्यास विलंब होत असल्याचे चित्र पुढे आले आहे.मधुरिमा, मालोजीराजे यांचा लढण्यास नकार, उमेदवारीबद्दलची उत्कंठा शिगेलाकोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे आमदार सतेज पाटील, मधुरिमाराजे, मालोजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले. खासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत न्यू पॅलेस येथे इच्छुक उमेदवारांची बैठक झाली, त्यावेळी या तिघांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यामुळे कोल्हापूर उत्तरचा काँग्रेसचा उमेदवार कोण याबद्दलची उत्कंठा पुन्हा ताणली गेली.न्यू पॅलेस येथे झालेल्या बैठकीस आमदार पाटील, मालोजीराजे यांच्यासह इच्छुक असलेले आमदार जयश्री जाधव, वसंतराव मुळीक, आनंद माने, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, दुर्वास कदम उपस्थित होते. आर. डी. पाटील मात्र अनुपस्थित होते. बैठकीत आनंद माने यांनी इच्छुकांच्यावतीने भूमिका मांडली. शिवसेना की काँग्रेस ?कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसला मिळणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. काँग्रेस तसेच उबाठाने या जागेवर जोरदार आग्रह धरला आहे. या जागेबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
गत निवडणुकीची पुनरावृत्ती..गेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा कोल्हापूर उत्तरचा उमेदवार कोण याबद्दल कमालीची उत्सुकता तयार झाली होती. रोज एक नाव वृत्तपत्रात येत होते. परंतु अखेरच्याक्षणी चंद्रकांत जाधव यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये येऊन अर्ज भरला आणि लढत जिंकली होती. यंदाही पक्षाकडून उमेदवारीचा घोळ अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवस झाले तरी सुरूच आहे.