बोरवडे (रमेश वारके) : साडेचार फूट घेरीची! साडेनऊ फूट लांबीची! अडीच टन वजनाची उखळी प्रकार असलेली, सहा पाउंडर गोळ्याचा मारा करणारी तोफ! बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपने सुमारे १७५ वर्षांनंतर २००० फूट खोल दरीतून सहाव्या मोहिमेत बाहेर काढली! ही तोफ किल्ल्यावरील निंबाळकर वाड्याशेजारी ठेवली आहे. या मोहिमेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणारे महादेव फराकटे यांच्या हस्ते तोफेचे पूजन करण्यात आले.
इसवी सन १८४४ च्या सुमारास गडकऱ्यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील तोफा दरीत ढकलल्या होत्या. आता अनेक वर्षांनंतर या तोफा शोधण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.
चालू वर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून ग्रुपच्या सदस्यांनी ही तोफ बाहेर काढण्यास प्रारंभ केला. गेली दोन महिने या तरुणांनी अथक परिश्रम करीत अखेर ही तोफ १५ एप्रिल रोजी गडावर आणण्यात यश मिळविले आहे.
या मोहिमेत १३ कायमस्वरूपी युवक आठवड्यातून तीन दिवस सहभागी झाले होते. यामध्ये सुनील वारके, जीवन फराकटे, बाजीराव खापरे ( मडीलगे खुर्द ), प्रवीण पाटील ( बिद्री ), शरद फराकटे , नेताजी साठे ,चंद्रकांत वारके ,राहुल मगदूम, मेजर सुनील फराकटे, निखिल परीट, अमर सातपुते, अरुण मगदूम, रघुनाथ वारके ( कासारवाडा ) , प्रज्योत चव्हाण, नेताजी सूर्यवंशी, अवधूत पाटील (खानापूर ), तानाजी साठे, भाऊ साठे, बजरंग मांडवकर ( वाळवे खुर्द ), अवधूत शिंगे, प्रथमेश पाटील या शिवप्रेमींनी सहभाग घेतला.
चौकट करणे :
‘घनदाट जंगल आणि शेकडो किलो वजनाची ही तोफ वर आणणे अशक्यप्राय गोष्ट. दरीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने आम्ही पाठीला पाण्याच्या बॉटल बांधून दरीत उतरलो. या यशस्वी मोहिमेनंतर त्रिवेणी ग्रुपच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.’
-सुनील वारके व प्रवीण पाटील (रांगणा मोहीम सदस्य)
फोटो ओळी - १) रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी पडलेली तोफ गडावर आणल्यानंतर तोफेसमवेत बोरवडे (ता. कागल) येथील त्रिवेणी रांगणा ग्रुपचे सदस्य.