विद्यमान नगरसेवक (दिवंगत) संतोष गायकवाड
आताचे आरक्षण : सर्वसाधारण महिला
तानाजी पोवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी अशी संमिश्र लोकवस्ती असणारा हा संभाजीनगर प्रभाग क्रमांक ५८ होय. या प्रभागावर दोनवेळा प्रभागाबाहेरील लोकप्रतिधींनी वर्चस्व गाजवले. हा प्रभाग सर्वसाधारण होणार या अपेक्षेने अनेकांनी तयारी केली, पण सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. विद्यमान नगरसेवक संतोष गायकवाड यांचे गेल्यावर्षी निधन झाल्याने काही महिने हा प्रभाग नगरसेवकाविनाच राहिला.
संभाजीनगर नावाने असलेल्या या प्रभागावर बाबासाहेब सासने यांनी दोन वेळा प्रतिनिधीत्व केले. त्यांचा प्रभागावर मोठा दबदबा होता. याशिवाय हरिदास सोनवणे व प्रकाश मोहिते या प्रभागाबाहेरील व्यक्तींनी येथे यापूर्वी प्रतिनिधीत्व गाजवले. सध्या आगामी निवडणुकीत इच्छुकांनी आपल्या पत्नीस रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली. अनेक मातब्बर इच्छुकांनी आपली राजनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: काँग्रेसच्या उमेदवारीसाठी येथे रस्सीखेच आहे. काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, यावरही चुरस वाढणारी ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडताना पालकमंत्री सतेज पाटील यांचा येथे कस लागणार हे निश्चित.
संतोष गायकवाड हे भाजपचे नगरसेवक होते. येत्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी राणी गायकवाड तसेच भावजय शिल्पा युवराज गायकवाड यांनी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. गतवेळी भाजपचे नगरसेवक असले तरी यंदा गायकवाड यांनी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्याचे समजते. याशिवाय स्वीकृत नगरसेवक किरण नकाते यांच्या पत्नी व माजी नगरसेविका माधुरी नकाते या ताराराणी-भाजपतर्फे तयारीनिशी रिंगणात उतरत आहेत. २०१३ च्या पोटनिवडणुकीत माधुरी नकाते यांनी पावणेदोन वर्षे प्रभागाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी त्यावेळचा विकास कामांचा तसेच किरण नकाते यांच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा दाखला मतदारांसमोर ठेवला आहे. चार उद्याने, तीन मिनी हॉल, सिंधुनगरी परिसरात बसवलेले २१ सीसीटीव्ही कॅमेरे, ओपन जिम, वृक्षारोपण, विसावा केंद्रासह सुमारे सव्वा कोटी रुपये रस्त्यांच्या कामाचा निधी ठेवला आहे.
बाबासाहेब सासने यांच्या स्नुषा स्वाती अजित सासने यांनीही काँग्रेस अगर राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. कल्याणी किशोर यादव, सुजाता सुजित जाधव, पूजा दीपक आरडे, प्रणवी शीतल मराठे हेही काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. सविता शशिकांत पाटील यांनीही काॅंग्रेस अगर शिवसेनेतर्फे रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी केली आहे.
दिवंगत नगरसेविका आशा बराले यांच्या स्नुषा वैष्णवी आशिष बराले याही नेहमीप्रमाणे जनसुराज्यतर्फे रिंगणात उतरत आहेत. त्यांनी सासुबाईंच्या कारकीर्दीतील प्रभागाच्या विकास कामांचा चेहरा पुढे आणला आहे. दिवंगत नेते प्रा. विजय कुलकर्णी यांच्या स्नुषा संस्कृती गणेश देसाई यांनीही भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. त्याशिवाय भरत जाधव हेही पत्नीसाठी प्रभागात चाचपणी करत आहेत.
पाच वर्षातील विकास कामे :
- कोंडाळेमुक्त प्रभाग
- वेळेवर कचरा उठाव
- गजानन महाराज नगरात उद्यान विकसित
- अंतर्गत सिमेंट पॅसेज पूर्ण
- मुख्य रस्ते डांबरीकरण
शिल्लक कामे :
- कामगार चाळ प्रश्न प्रलंबित
- गजानन महाराज नगरात कमी दाबाने पाणीपुरवठा
- ओम गणेश कॉलनी उद्यान दुर्लक्षित
- रेसकोर्स नाका झोपडपट्टी प्रश्न प्रलंबित
- अपुरी ड्रेनेज लाईन व्यवस्था
गत निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांची मते :
- संतोष गायकवाड (भाजप)-१७१८
- हरिदास सोनवणे (काँग्रेस)-१३८०
- रवींद्र शिवराम आवळे (राष्ट्रवादी)-८६५
- रतन पचेरवाल (शिवसेना)-२९०
फोटो नं. ०४०३२०२१-कोल-संभाजीनगर प्रभाग (केएमसी)
ओळ : कोल्हापुरात संभाजीनगर प्रभागातील महापालिकेच्या कामगार चाळ परिसरात नेहमीच कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले असते.