कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला संशयित कारचालक महादेव ऊर्फ गुंडा नामदेव ढोले (वय ४४, रा. कोडोली, ता. पन्हाळा) याने शिक्षक कॉलनीतील ‘त्या’ रूममध्ये कोट्यवधी रुपये असल्याची ‘टीप’ मैनुद्दीनला दिली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून तो वारणानगरात नोकरीस आहे. त्याच्यासह मैनुद्दीन मुल्ला, विनायक जाधव (रा. भामटे, ता. करवीर), संदीप बाबासाहेब तोरस्कर (रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) व रेहान अन्सारी (रा. बिहार) या पाचजणांनी पूर्वनियोजित कट रचून चोरी केल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी मैनुद्दीनचा साथीदार संशयित संदीप तोरस्कर याला अटक केली. त्याच्या चौकशीमध्ये महादेव ढोलेचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली. तो वारणानगर परिसरातील सर्व माहिती मैनुद्दीनला देत होता. मैनुद्दीनसह पाच जणांनी मिळून चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. तोरस्कर व ढोले यांच्या वाट्याला प्रत्येकी दहा लाख रुपये आले होते. संशयित तोरस्कर याने जाधववाडी येथील एका वृद्धास चोरीच्या पैशातील २ लाख २० हजार रुपये दिले होते. ते पोलिसांनी हस्तगत केले. या प्रकरणातील पाचवा संशयित अन्सारी अद्याप मिळालेला नाही. मैनुद्दीनही गायब असून त्याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीआयडीच्या तपासाला आजपासून गती शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाचा तपास आराखडा तयार केला आहे. आज, सोमवारपासून या प्रकरणाच्या तपासाला गती मिळेल. सर्वप्रथम या प्रकरणातील ‘त्या’ सात संशयित पोलिसांना अटक केली जाईल, अशी माहिती ‘सीआयडी’चे पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली.
कारचालकाने दिली ‘टीप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2017 12:06 AM