साळवण : कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गावर साळवण येथील धोकादायक वळणावर कारचालकाचा ताबा सुटून शेतात भांगलण करणाऱ्या महिलांना धडकली. या अपघातात आंबूताई एकनाथ पडवळ (वय ६०, रा. साळवण, ता. गगनबावडा) यांचा मृत्यू झाला. तर दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आंबूताई, जखमी सविता गंगाराम पडवळ व सुजाबाई संभाजी शिंदे (सर्व रा. साळवण) या घराशेजारील शेतात उसाची भांगलण करीत होत्या. सोमवारी दुपारी गगनबावड्याहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कारवरील (एमएच १२ एमएफ 0२९९) ताबा सुटून जवळच्या शेतात घुसली. यावेळी शेतात काम करीत असलेल्या महिलांना कारची जोरात धडक बसली. या धडकेत आंबूताई या गंभीर, तर सविता व सुजाबाई या किरकोळ जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे नेले असता उपचारादरम्यान आंबूताई यांचा मृत्यू झाला.ही घटना घडली त्यावेळी आजूबाजूला कोणीच नसल्याचा फायदा घेत कार चालकाने तेथून पळ काढला. त्यामुळे कार चालकाचे नाव समजू शकले नाही. तेथून जाणाºया एका प्रवाशाला या अपघाताची जाणीव होताच घटनेशेजारी असलेल्या पडवळ यांच्या घरी माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. अपघाताची फिर्याद तानाजी पडवळ यांनी दिली. आंबूताई यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या अपघाताची नोंद गगनबावडा पोलिसांत झाली असून, पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक बाजीराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार श्रीकांत मोरे, पो. कॉ. जगदीश वीर हे करीत आहेत.
साळवणजवळ कार शेतात घुसून महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:48 AM