कोल्हापूर : रंकाळा ते फुलेवाडी मार्गावर पेट्रोल पंपानजीक रस्ता दुभाजकाला धडकून मोटारकार उलटल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. अपघातात अशोक पाखरे (वय ६३, रा. फुलेवाडी रिंग रोड) व त्यांच्या पत्नी जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अंधुक प्रकाश व अरुंद रस्त्यामुळे हा रस्ता दुभाजक वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळाच बनला आहे. या रस्ता दुभाजकाला धडकून दर आठवड्याला किमान दोन ते तीन अपघात होतात.
रंकाळा ते फुलेवाडी मार्गावर पेट्रोलपंपानजीक नाल्यावरील पुुलामुळे हा रस्ता अरुंद बनला आहे, या परिसरातील रस्ता दुभाजकावरील विजेचा खांब दोन वर्षापूर्वीच अपघातात कोसळल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे येथे कोल्हापूरकडून फुलेवाडीकडे जाणारी वाहने रस्त्याचा अंदाज न आल्याने थेट रस्ता दुभाजकावरच चढतात. त्यातून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या धोकादायक रस्ता दुभाजकाबाबत नागरिकांनी अनेक वेळा कळवूनही महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सायंकाळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात व वेगवान वाहतूक असते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शनिवारी (दि. १२) रात्रीही या रस्ता दुभाजकावर एक मोटारकार चढून ती उलटली. या दुर्घटनेत किरकोळ जखमी झाले; पण रविवारी पुन्हा याच धोकादायक रस्ता दुभाजकाला मोटारकार धडकून वृद्ध शिक्षक दाम्पत्य धडकून जखमी झाले. मोटारकारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
फोटो नं. १३१२२०२०-कोल-कार ॲक्सिडेंट
ओळ : कोल्हापुरात रंकाळा ते फुलेवाडी मार्गावर पेट्रोलपंपानजीक रस्ता दुभाजकाला मोटारकार धडकून झालेले नुकसान. (छाया : दीपक जाधव)
(तानाजी)