कोल्हापूर : उद्यमनगर येथील रिगल स्प्रे-पेंटिंग गॅरेजमध्ये शनिवारी दुपारी चारच्या सुमारास कारला वेल्डिंग करीत असताना शॉर्ट सर्किटने कार्बाईड गॅसटाकीचा स्फोट होऊन किरकोळ नुकसान झाले. दरम्यान, या स्फोटाचे वृत्त वॉट्सअॅपवरून शहरात पसरताच खळबळ उडाली. गॅसटाकीपासून दहा फूट अंतरावर वेल्डिंगचे काम करीत असलेले कामगार सुहास विटेकरी हे बाजूला पळाल्याने बचावले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, उद्यमनगर येथे बाळासाहेब तातोबा रेणके यांचे रिगल स्प्रे-पेंटिंग गॅरेज आहे. याठिकाणी कामगार सुहास आप्पासो विटेकरी हे कारला वेल्डिंग करीत असताना अचानक शॉर्ट सर्किटने कार्बाईड गॅसटाकीचा स्फोट झाला. टाकीपासून कारच्या पलीकडे दहा फुटांवर ते उभे होते. स्फोट होताच ते हातातील वेल्डिंगची केबल टाकून बाजूला पळाल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. गॅसटाकीतील पांढरे गरम पाणी आजूबाजूला उडून पडले होते. स्फोटाचा आवाज ऐकून दुसऱ्या खोलीमध्ये काम करीत असलेले कामगार बाजीराव कांबळे, ओमकार रेणके, नितीन रायमाने यांच्यासह शेजारील कारखान्यांतील कामगारही बाहेर पळत आले. यावेळी गॅसटाकी फुटून बाजूला पडली होती. या स्फोटाचे वृत्त शहरात पसरताच खळबळ उडाली. राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)
उद्यमनगरात कार्बाईड गॅसटाकीचा स्फोट
By admin | Published: March 29, 2015 12:28 AM