माजी नगरसेवक ईश्वर परमार यांचे मित्र असलेल्या डॉ. कर्णिक यांच्याशी चर्चा करताना महापालिकेसाठी थोडा वेळ द्यावा आणि गाेरगरीब रुग्णांची सेवा करावी, अशी विनंती झाल्यानंतर डॉ. कर्णिक यांनी त्यास होकार दिला. त्यानुसार परमार यांनी त्यांची भेट प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी घालून दिली. बलकवडे या स्वत: डॉक्टर असल्याने त्यांना ही संकल्पना आवडली.
आठवड्यातून एक दिवस सावित्रीबाई फुले रुग्णालयात ठरावीक वेळेत उपस्थित राहून हृदयरोगाशी संबंधित रुग्ण तपासणे व त्यांना योग्य ते मार्गदर्शन व उपचार करणे असे काम डॉ. कर्णिक करण्यास तयार आहेत. त्यासाठी त्यांना ईसीजी मशीन, एक कक्ष, एक बेड, टेबल खुर्च्या अशी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. डॉ. कर्णिक त्यांच्याकडील पोर्टेबल इको मशीन देण्यासही तयार आहेत.
महापालिकेकडून अधिकृत मान्यता दिल्यानंतरच ते काम सुरू करतील, अशी अपेक्षा असून, रुग्ण संख्या पाहून आठवड्यातून एक दिवस यायचे की दोन दिवस हे ठरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.