कोल्हापूर : घराच्या परिसरात कीटकनाशक पावडर टाकायची आहे, औषध फवारणी करायची आहे, असे निमित्त काढून दोन चोरट्यांनी रुईकर कॉलनी परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. दिवसाढवळ्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या रुईकर कॉलनीत हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली. त्यानंतर नागरिकांनी त्या चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.कदमवाडी, रूईकर कॉलनी परिसरात शुक्रवारी सकाळी नगरसेवक सत्यजित कदम यांनी ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी केली. पण त्यानंतर दुपारी दोन युवक तोंडाला मास्क लावून रूईकर कॉलनी परिसरातील डॉ. सतीश पाटील यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांच्या घराच्या आवारात कीटकनाशक पावडर फवारणी करायचे असल्याचे सांगून त्यांनी सुमारे तासभर पावडर टाकून निघून गेले.
सुमारे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हे दोघे पुन्हा आले. त्यांनी बिनधास्तपणे परिसरात वावर केला. त्याचवेळी डॉक्टरांच्या वडिलांनी त्या दोघांना हटकण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी जेवणाचा डबा विसरल्याचे निमित्त काढून तेथून धूम ठोकली. पण काही वेळाने पाटील यांच्या घराच्या पिछाडीस असणारे लोखंडी पाईप्ससह इतर साहित्य त्या दोघा चोरट्यांनी कंपौऊंडवरून पलीकडे मैदानात टाकल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर परिसरात खळबळ उडाल्याचे पाहून चोरटे पसार झाले. दरम्यान, याच चोरट्यांनी परिसरातील उदय बागवडे या वृद्ध दांपत्याच्याही घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी तेथे केबल आॅपरेटर दुरुस्तीसाठी आल्याचे सांगितले.