एकनाथ पाटीलकोल्हापूर : मोबाईल इंटरनेटवर खेळल्या जाणाऱ्या पबजी गेमच्या आहारी शेकडो लहान मुलांसह तरुणवर्ग गेला आहे. ही मुले २४ तासांपैकी १४ ते १६ तास मोबाईल हातात घेऊन खेळत असतात. यामुळे त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊन अनेक मुलांना मानसिक आणि शारीरिक समस्या जाणवू लागल्या आहेत.
मोबाईलवरील ३ बाय ३च्या स्क्रीनमध्ये त्यांचे जीवन गुरफटलेले पाहायला मिळत आहे. समाजाशी संपर्क तुटून एकलकोंडे राहताना ते दिसतात. वेळप्रसंगी ही मुले स्वत:च्या जिवाचे बरे-वाईट करू शकतात. इतरांनाही दुखापत पोहोेचवू शकतात. त्यामुळे पालकांनी वेळीच आपल्या मुलांना सांभाळणे गरजेचे आहे, अन्यथा पबजी गेम जीव घेऊ शकतो.बेळगावमध्ये मोबाईलवर पबजी गेम खेळण्यास विरोध केल्याने संतापलेल्या मुलाने वडिलांचा खून केला, तर रात्रंदिवस पबजी गेम खेळून कोल्हापुरातील पोर्ले तर्फ ठाणे येथील इंद्रजित बजरंग कोळी या तरुणाला मानसिक धक्का बसला. या दोन्ही घटनांनी महाराष्ट्र-कर्नाटकात खळबळ उडाली आहे. शेकडो लहान मुले, तरुण गेमच्या आहारी गेल्याचे धक्कादायक चित्र आहे. मुलांना गेमपासून परावृत्त करणे पालकांची डोकेदुखी होऊन बसली आहे.इंटरनेटवरचा हा पबजी गेम मुले, तरुणांसाठी हानिकारक आहे. सतत पबजी खेळत असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. मुले सलग तीन ते चार तास गेम खेळण्यात व्यस्त असतात. घरच्या कुटुंबापासून दूर राहून बंदखोलीत पबजी खेळण्यामध्ये ते रमबाण होतात. त्यांना कुटुंबीयाने एखाद्या कामात गुंतवले, शाळेत पाठविले तर त्यांच्या मनामध्ये कधी हा खेळ सुरू करतो व मित्रांबरोबर बोलत राहतो, अशी मानसिकता तयार होत असते. खेळासाठी त्यांना प्रवृत्त केले जाते.
शाळा-कॉलेजमधील बहुतांशी मुले, तरुण गेम खेळण्यांमध्येच व्यस्त दिसतात. याचा परिणाम क्लासला गैरहजर राहिल्याने परीक्षेत नापास होणे, कमी गुण पडणे असा होतो. त्यामुळे कुटुंबीयात वादावादीचे प्रकार घडतात. या गेममुळे मुले मानसिक आजाराला बळी पडत आहेत. अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीरात तेज निर्माण होते. त्याचप्रमाणे हा गेम खेळल्यानंतर मुलांच्यात उत्साह वाढतो. खतरनाक व्हिडीओ गेम त्यांच्या मनावर मोठा परिणाम करत आहे.
पालकांनी लक्ष देणे गरजेचे मुलांना मोबाईल द्यायचा की नाही, कुठल्या वयामध्ये द्यायचा, संपर्क साधण्यापुरता मोबाईल द्यायचा की मोबाईल दिला तर इंटरनेट द्यायचे की नाही. तो दिवसाला किती आॅनलाईन असतो. आताची मुले चपळ आहेत. मोबाईल लॉक करून दिला तर अनलॉक करून मित्रांच्या मदतीने इंटरनेटचा रिचार्ज मारतात. वेळोवेळी एखाद्या खोलीत एकटाच बसत असेल तर तो मोबाईलमध्ये व्यस्त आहे, याची माहिती झाली पाहिजे.
मुलांचे दंगा, मस्ती करण्याचे वय असताना ते शांत कसे बसतात. ही शंका पालकांच्या मनामध्ये येणे गरजचे आहे. अलीकडच्या मुलांचे सर्कल आहे. त्यांच्यामध्ये चर्चा आहे. मी एक टप्पा गेमचा गाठला आहे. त्यामुळे स्पर्धा निर्माण होते. मी इतरांपेक्षा कसा सरस हे दाखविण्यासाठी मुले या माध्यमांचा वापर करताना दिसत आहेत.डॉ. निखिल चौगले, मानसोपचारतज्ज्ञ
पबजी गेम काय आहे.....पबजी हा एक आॅनलाईन गेम आहे. त्यामध्ये १०० खेळाडू एका विमानामधून उंच पर्वतावर उडी मारतात. त्यानंतर छावण्यांचा आधार घेत सगळेच हत्यार, बंदुका, औषधे शोधत एकमेकाला मारण्यास सुरुवात करतात. काही खेळाडू चार लोकांचा ग्रुप बनवितात. प्रत्येक खेळाडूचे अंतिम लक्ष शेवटपर्यंत जिवंत राहण्याचे असते.
मुलांना या गेमची गंभीरता माहिती नसते. ते फक्त मनोरंजन म्हणून खेळत असतात; परंतु जेव्हा मुले त्या गेममध्ये जास्त वेळ खेळू लागतात त्यावेळी त्यांना सवय लागते. त्यांना प्रश्न पडतो की, गेम खेळताना आपण जिंकलो पाहिजे, त्यामध्ये कुठेही कमी पडू नये. त्यामुळे ते दिवसभर या गेमच्या आहारी जातात. शंभर लोकांमध्ये शेवटपर्यंत जो थांबतो तो गेमचा विनर बनतो. विनर बनण्यासाठी मुले गेमच्या आहारी जातात.
- मुले हिंसक बनतात, नशेसारखाच परिणाम होतो
- डोक्यात बदल घडतात.
- नशेसारखेच तेजीत होतात
- मानसिक स्थिती बिघडली जाते
- भुकेवर परिणाम होतो.
- झोप बिघडून जाते
- स्वत:ची निगा राखण्याकडे दुर्लक्ष करतात
- किरकोळ गोष्टीवर हिंसक होतात
- एकाग्रतेवर परिणाम होतो.