कोल्हापूर - विविधरंगी पाना-फुलांनी सजविलेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा आकर्षक रथ, छत्रपती शाहू महाराजांवर आधारित देखाव्यांसह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाºया चित्ररथांच्या रॅलीने रविवारी सकाळी फ्लॉवर फेस्टिव्हल कर्निव्हलची सुरुवात झाली. ताराराणी चौक येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला.
कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाच्यावतीने कोल्हापुरात आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य अनोख्या, अद्भूत लाखो फुलांचा उत्सव असलेला ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’च्या जनजागृतीसाठी या कार्निव्हल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, अंजली चंद्रकांत पाटील, ‘केएसबीपी’चे प्रमुख सुजय पित्रे, राहुल कुलकर्णी, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, ‘निर्मिती’चे अनंत खासबागदार, शिरीष खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्निव्हल रॅलीनिमित्त छत्रपती ताराराणी पुतळ्याला फुलांनी आकर्षक सजावट केली होती. विद्यार्थी-विद्यार्थिनी आकर्षक फ्लॉवर मास्क घालून पाहुण्यांचे स्वागत करत रॅलीस प्रारंभ झाला. कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हल कार्निव्हल चित्ररथ रॅलीमधील विविध पाना-फुलांनी सजविलेले विविध रथ, ग्रामसंस्कृतीचे आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाºया देखाव्यांनी नागरिक भारावले. धनगरी ढोल, महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नृत्य हेही सर्वांचे आकर्षण ठरले. महाराणी ताराबाई चौकातून निघालेली कार्निव्हल रॅलीपुढे धैर्यप्रसाद चौक, पितळी गणपतीमार्गे पुढे पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस उद्यान येथे समारोप झाला.
यावेळी त्यांनी झांजपथकाच्या तालबद्ध वाद्यावर ठेका धरला. रॅलीतील सहभागी सर्वांनाच त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, माणिक पाटील-चुयेकर ‘पणन’चे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, ‘विद्याप्रबोधनी’चे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, शहर वाहतूक विभागाचे निरीक्षक अशोक धुमाळ, अवनि संस्थेचे अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी शहरातील नर्सरीचालक आणि नागरिक विद्यार्थी उपस्थित होते.
रॅलीतील प्रमुख वैशिष्ट्ये...
चित्ररथ रॅलीमध्ये विविध फुलांनी सजविलेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई-महालक्ष्मीचा रथ विशेष आकर्षण होते. या रॅलीमध्ये डोळे दिपणारे पाना-फुलांनी सजविलेले भव्य आणि आकर्षक हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी, राष्ट्रध्वजाची प्रतिकृती, स्वच्छ भारत अभियानाचा लोगो, ‘मेक इन इंडिया’चा लोगो उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.