(फोटो-२१०४२०२१-कोल-राजाराम हेग्गाण्णा)
लोकमत न्यूज नेटवर्क
बुबनाळ : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून डोणोली (ता. शाहूवाडी) येथील ‘गोकुळ’च्या ठरावधारकापाठोपाठ बुबनाळ (ता. शिरोळ) येथील ठरावधारक राजाराम शिवाप्पा हेग्गाण्णा (वय ७१) यांचा बुधवारी कोराेनाने मृत्यू झाला. पाच दिवसांत जिल्ह्यात दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली असून, ठरावधारकांसह उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
‘गोकुळ’ची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. अशा वातावरणात ‘गोकुळ’ची निवडणूक होत आहे. शनिवारी (दि. १७) शाहूवाडी तालुक्यातील डोणोली येथील सुभाष पाटील या ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू झाला. अवघ्या पाच दिवसांत बुबनाळ येथील राजाराम हेग्गाण्णा यांचा मृत्यू झाल्याने ठरावधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हेग्गाण्णा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पंधरा दिवसांपूर्वी मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी दहा वर्षे बुुबनाळचे सरपंच म्हणून काम केले होते.