लोकमत न्यूज नेटवर्क
राजाराम लोंढे
कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी उमेदवार आणि इच्छुकांची संख्या पाहता कोणाला थांबवायचे आणि कोणाला संधी द्यायची, असा पेच सत्तारूढ व विरोधी आघाडीसमोर आहे. त्यात या निवडणुकीच्या आडून नेत्यांना विधानसभा, विधान परिषदेचे राजकारण सेफ करत पॅनलचा समतोल राखायचा असल्याने नेत्यांची कसरत होत आहे. ‘स्वीकृत’, जिल्हास्तरीय समित्या, महामंडळाची सदस्य पदे, अशी अनेक प्रकारचे शब्द देऊन बंडोबांना थंड करण्याचा प्रयत्न आहे.
‘गोकुळ’च्या आतापर्यंतच्या निवडणुका पाहिल्या, तर त्या एकतर्फीच व्हायच्या. त्यामुळे सत्तारूढ गटातून उमेदवारी मिळणे हेच महत्त्वाचे असायचे. तिथेही वीस- पंचवीस वर्षांपासून प्रस्थापित तळ ठोकून असायचे. त्यामुळे पंचवार्षिकमध्ये दोन- तीन नवीन चेहरेच संचालक मंडळात दिसायचे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, या वेळेला परिस्थिती काहीसी वेगळी आहे. दोन्ही पॅनल तगडी होणार आहेत. त्यामुळे संचालक मंडळात जाण्यासाठी अनेकांना धुमारे फुटू लागले आहेत. त्यातूनच उच्चांकी ४८२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करून शड्डू ठोकले. त्यात संचालक मंडळाची संख्या १८ वरून २१ वर पोहोचल्याने इच्छुकांचे मनसुबे अधिक बळकट झाले आहेत.
प्रत्येक जण आपण कसा योग्य उमेदवार आहे, हे नेत्यांना पटवून देत असले तरी विधानसभा निवडणुकीत किती फायदा होऊ शकतो? विधान परिषद निवडणुकीत नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य कोणाकडे किती आहेत, याचा ठोकताळा सुरू आहे. ‘गोकुळ’च्या आडून प्रत्येक नेत्याला आपले पुढील राजकीय आडाखे पक्के करून घ्यायचे असल्याने पाच वर्षे कोणी काय केेले, संघर्षात कोण कोणाच्या बाजूने होता, हे पाहिले जाईल, असे सध्यातरी दिसत नाही. हे नाराज विरोधकांच्या हाताला लागू नयेत म्हणून विविध पदांचे गाजर दाखवले जात आहे. संचालक मंडळात दोन स्वीकृत तर एक शासन नियुक्त प्रतिनिधी घेता येतो. या तीन जागांसाठी दोन्ही आघाड्यांकडून १५ जणांना शब्द दिलेला आहे. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान, जिल्हा नियोजन समितीसह शासकीय महामंडळ व इतर समित्यांवर सदस्य म्हणून वर्णी लावण्याचे शब्द देऊन अनेकांना थंड करण्याचा प्रयत्न आहे. नियुक्त्यांच्या गाजराने इच्छुकांची समजूत काढू शकतो, असे नेत्यांना वाटते. मात्र, निवडणुकीत त्याचे ‘साइड इफेक्ट’ होणार, हे निश्चित आहे.
मताचे गणित पाहूनच उमेदवारी
‘गोकुळ’ची निवडणूक ही अटीतटीची होणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे किती मतांचा गठ्ठा आहे, तालुक्यासह इतर मते किती खेचून आणू शकतो, हे पाहूनच उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. त्यादृष्टीने इच्छुकांनी आपल्या तालुक्याबरोबरच दुसऱ्या तालुक्यातील समर्थक, पै-पाहुण्यांच्या माध्यमातून उमेदवारीसाठी ताकद लावली आहे.
पाच वर्षे पळाल्यांमध्ये अस्वस्थता
‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत थोडक्यात पराभव झाल्याने गेली पाच वर्षे ‘गोकुळ’ बचावच्या माध्यमातून बहुतांशी पराभूतांनी सत्तारूढ गटाला निकराची टक्कर दिली. आता पॅनल तगडे होत असताना बाहेरचा रस्ता दाखवला असल्याने अनेक जण अस्वस्थ आहेत. पॅनल जाहीर झाल्यानंतर या अस्वस्थतेचा भडका उडणार, हे मात्र निश्चित आहे.