सावंतवाडी : आंबोली घाटातील पुलाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासन व बांधकाम विभागाने घेतला होता. मात्र, आंबोली ग्रामस्थांनी अवजड वाहतूकच का, सर्वच वाहतूक बंद करा, अन्यथा आम्ही वाहतूक बंद करू, असा इशारा दिला होता. याची दखल घेत बांधकाम विभागाच्या संकल्पचित्र मंडळाचे अधीक्षक अभियंता व्ही. पी. रामगुडे यांनी आंबोलीला भेट देत रविवारी घाटाची पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी उशिरा झालेल्या बैठकीत आंबोली घाटातून काही अटींवर अवजड वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता प्रकाश शिंदे, उपविभागाच्या अभियंता अनामिका जाधव, शाखा अभियंता व्ही. मुल्ला, उपस्थित होते. शनिवारी आंबोली घाटाची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली होती. त्यावेळी आंबोलीतील डंपरचालक तसेच ग्रामस्थ आणि व्यापारी यांनी पालकमंत्र्यांकडे कैफियत मांडली होती. अवजड वाहतूक बंद झाल्यास व्यवसाय कसा करायचा? आम्हालाच बंदी का? असे विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर तोडगा काढा, अन्यथा सर्वच वाहतूक बंद पाडू, असा इशारा ग्रामस्थ व डंपर चालक-मालकांंनी दिला होता. रामगुडे यांनी अवजड वाहतूक इतर ठिकाणावरून वळविता येते का, याचीही चाचपणी केली; पण सद्य:स्थितीत ते शक्य नसल्याचे दिसून आले आहे.पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उपविभागीय अभियंता अनामिका जाधव यांनी अधीक्षक अभियंत्यांना यासंदर्भात बैठक सुरू असल्याचे सांगितले.
सशर्त अटी घालून आंबोली घाटातून अवजड वाहतूक
By admin | Published: March 01, 2015 10:40 PM