लोकमत न्यूज नेटवर्क
गांधीनगर : आपत्कालिन स्थितीत प्रशासन वळीवडेकडे का दुर्लक्ष करते, असा संतप्त प्रश्न सरपंच अनिल पंढरे यांनी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना केला. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा त्यांनी अन्य पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर पाढाच वाचला.
पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे वळीवडे, गांधीनगर, वसगडे, उचगाव या गावांतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार शीतल मुळे-भामरे या करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्यासमवेत आल्या होत्या. त्यावेळी ग्रामस्थांनी भामरे-मुळे यांना धारेवर धरले. पंढरे म्हणाले की, आपत्कालिन स्थितीत नेहमीच प्रशासनाने वळीवडेला दुर्लक्षित केले आहे. वारंवार संपर्क साधूनही आपला संपर्क होत नव्हता. आपल्याला संदेश पाठवले; मात्र ते अद्यापही पाहिले गेले नाहीत. पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी आम्हाला बोट हवी होती. अखेर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शेजारील गावांच्या सहकार्याने पूरग्रस्तांची व्यवस्था आम्ही केली, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या उदासिनतेबद्दल खंत व्यक्त केली. यावर गटविकास अधिकारी उगले यांनी स्थानिक पातळीवर मंडल अधिकारी, तलाठी असल्याचे सांगताच सरपंच पंढरे व पोलीस पाटील दीपक पासान्ना यांनी ते नेहमी वरिष्ठांकडे बोट दाखवतात. मग गावपातळीवर आम्ही करायचे तरी काय? असा प्रश्न विचारला. दरम्यान, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांचा रोष कमी झाला.
फोटो ओळ:-
वळीवडे (ता. करवीर) येथील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना पूरस्थितीमध्ये प्रशासनाने दुर्लक्ष का केले, असा प्रश्न सरपंच अनिल पंढरे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांनी विचारला.