कोल्हापूर : मुंबईतील नालासोपारा परिसरातील एका घरातून स्फोटकेप्रकरणी अटक केलेल्या तिघांचे कोल्हापूर, सांगली व सातारा येथे कनेक्शन असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.
अटक करण्यात आलेला संशयित शरद कळसकर याने कोल्हापुरात चार वर्षांपूर्वी लेथ मशीनचे प्रशिक्षण घेऊन कामही केले होते. तो मूळचा औरंगाबादचा आहे. त्याचा गोविंद पानसरे हत्या प्रकरणात काही संबंध आहे का? याचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’चे पथक या तिघांना ताब्यात घेणार आहे. याबाबत कोल्हापुरात शनिवारी वरिष्ठ अधिकाºयांची गोपनीय बैठक झाली.
संशयित शरद कळसकर हा कोल्हापुरात शिक्षणासाठी होता. त्याने लेथ मशीनचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तो लेथ मशीनवर काम करीत होता. यावेळी त्याचे मित्र सुधन्वा गोंधळेकर व वैभव राऊत कोल्हापुरात येऊन शरदला भेटत असत. एकाच खोलीवर ते वास्तव्याला असायचे. तेथून सांगली व सातारा येथील मित्रांकडेही ते जात असल्याची माहिती पुढे येत आहे. बंगलोर येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात वैभव राऊतचे नाव पोलीस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे पानसरे हत्या प्रकरणात या तिघांचा काही संबंध आहे का? त्यादृष्टीने त्यांची चौकशी केली जाणार आहे. कळसकर कोल्हापुरात ज्या ठिकाणी वास्तव्यास होता त्याची चौकशी करण्यासाठी एक तपास पथक कोल्हापुरात दाखल झाल्याचे समजते. मात्र, याबाबत कमालीची गोपनीयता राखण्यात आली आहे. या तिघांना ‘एटीएस’ने अटक केल्यानंतर ‘एसआयटी’च्या पथकाची कोल्हापुरात बैठक झाली. संशयित कळसकर व गोंधळेकर गेल्या चार वर्षांपासून राऊतच्या संपर्कात असल्याचे समजते.दोघे संशयित ताब्यात?पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’च्या पथकाने दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते. मात्र, याबाबत तपास पथकाने गोपनीयता ठेवली आहे. ताब्यात घेतलेल्यांची पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात चौकशी झाली आहे. या दोघांकडून काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचेही समजते; पण याला अधिकाºयांनी दुजोरा दिला नाही.