कोल्हापूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन न करता बेकायदेशीरपणे प्रभागात रॅली काढल्यामुळे शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह त्यांच्या ६० कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला.
शुक्रवारी सायंकाळी रविकिरण इंगवले यांनी भारत मंदिर, खरी कॉर्नर, निवृत्ती चौक, सरदार तालीम, फिरंगाई तालीम, न्यू कॉलेज व परत भारत मंदिर या मार्गावर सुमारे १५० ते २०० कार्यकर्त्यांना एकत्र करून रॅली काढली. कोविड संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करायची नाही, सामाजिक अंतर ठेवायचे, असे शासनाचे निर्देश असतानाही ही रॅली काढण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी स्वत: फिर्याद नोंदवून हा गुन्हा दाखल केला.
इंगवले यांच्यासह उमेश पाटील, कपिल केसरकर, सचिन चौगले, सुमित चौगले, राहुल इंगवले यांच्यासह ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलीस हवालदार सुनील आमते स्वत: फिर्यादी आहेत. भादंविक १८८, १४३, २६९, २७० व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब), साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम २, ३ आणि महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना २०२० कलम ११ प्रमाणे हा गुन्हा नोंद झाला आहे.
इंगवले हे फिरंगाई मंदिर प्रभागातून महानगरपालिकेची निवडणूक लढविणार आहेत. त्याची जोरदार तयारी त्यांनी सुरू केली आहे. शुक्रवारी त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्याच्या हेतूने ही रॅली काढली. ती शिवाजी पेठेत चर्चेचा विषय ठरली.