आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २६ : ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. म्हाडा कॉलनीजवळ, राजेंद्रनगर) यांच्या खूनप्रकरणातील संशयित महिला आरोपी मंगला गणपती पाटील (५५, रा. राजेंद्रनगर) हिचा जामिन जिल्हा व सत्र न्यायाधिश ए. एम. शेटे यांनी बुधवारी फेटाळला.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयित प्रीतम गणपती पाटील (३०, रा. राजेंद्रनगर), त्याची आई मंगला गणपती पाटील (५५) अशी त्यांची नावे आहेत. डॉ. किरवले यांचा शुक्रवारी (दि. ३) राहत्या घरी निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले. हा खून शेजारीच राहणारा प्रीतम पाटील याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याला मदत व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याची आई मंगला पाटील हिलादेखील अटक केली.
चौकशीमध्ये प्रीतम पाटील याने बंगल्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून खून केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संचकारपत्र ताब्यात घेतले. संशयित प्रीतम पाटील याने दि. २२ फेब्रुवारी २०१७ रोजी डॉ. किरवले यांचे नावे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स येथील मुद्रांक विक्रेत्या कांचनमाला कुमठेकर यांच्याकडून १०० रुपयांचा स्टॅम्प खरेदी केला. त्यानंतर दि. १ मार्च २०१७ रोजी किरवले व संशयित प्रीतम पाटील यांच्यात संचकारपत्र झाले. दि. ३ मार्च २०१७ रोजी संचकारपत्रावर सह्या झाल्या. त्यामध्ये काही ठिकाणी खाडाखोड केल्याचे दिसत आहे.
संचकारपत्रावर अॅड. एस. डी. वाघरे यांची ओळख व सही आहे तसेच नोटरी अॅड. रेहाना मुबारक शेख (रा. भोई गल्ली, रविवार पेठ) यांच्याकडे केली आहे. डॉ. किरवले यांचे मतदान ओळखपत्राची झेरॉक्स व सही आहे. साक्षीदार म्हणून संशयित प्रीतमचे वडील गणपती पाटील यांची सही आहे. या संचकारपत्रानुसार रविवारी वकील, मुद्रांक विक्रेता, साक्षीदार यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी करून जबाब नोंदविले. संशयित माय-लेकावर खून व अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे करत आहेत.