संदीप बावचे - जयसिंगपूर शहरातील क्रांती चौकातील वाहतुकीची कोंडी हाच महत्त्वपूर्ण विषय असून, जयसिंगपूर बसस्थानक स्थलांतर करण्याची गरज आहे. नव्या बसस्थानकासाठी सांगली-कोल्हापूर मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील महाराष्ट्र शासनाची सुमारे साडेचार एकर जागा यासाठी पर्याय ठरू शकते. लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेऊन स्थलांतराचा प्रश्न लावून धरण्याची गरज आहे.जयसिंगपूर शहराचा गेल्या २५ वर्षांत सर्वांगीण विकास झाला असून, शिरोळ तालुक्यातील एक प्रमुख शहर म्हणून नावारूपास आले आहे. या ठिकाणी असलेले बसस्थानक मात्र ‘जैसे थे’ असल्यामुळे क्रांती चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. एस.टी. बसस्थानकासाठी यापूर्वी शिरोळ-कोल्हापूर बायपास रोडवरील विभूते शाळेसमोरील जागा सुचविण्यात आली होती. पर्यायाने हा विषय मागे पडला. मात्र, सध्या वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे बसस्थानक अपुरे पडत आहे. बसस्थानकाचा विस्तार रखडला आहे. बसस्थानक स्थलांतर हाच पर्याय आता समोर आला आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सुमारे साडेचार एकर जागा यासाठी उपयुक्त ठरू शकते. ही जागा महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असून, या जागेवर सुसज्ज असे बसस्थानक होऊ शकते. नगरपालिकेने यासाठी पुढाकार घेऊन जागा हस्तांतरित करण्याची गरज आहे. (उत्तरार्ध)सिग्नल बंद--क्रांती चौकात जयसिंगपूर पालिकेने सात लाख रुपये खर्च करून सिग्नल उभा केला. मात्र, बसस्थानक जवळच असल्यामुळे हा सिग्नल उपयुक्त ठरत नाही. बंद अवस्थेत असलेल्या सिग्नलमुळे वाहतूक सुरळीत होणे अडचणीचे ठरत आहे. प्रमुख बसस्थानक--जयसिंगपूर बसस्थानक एस. टी. महामंडळाला मोठे उत्पन्न देणारे बसस्थानक आहे. या बसस्थानकावरून दररोज १६०० बसेस ये-जा करतात. हजारो प्रवाशांना उपयुक्त असलेल्या बसस्थानकाची जागा अपुरी पडत आहे. पर्यायाने विस्तारित जागेत बसस्थानक असणे गरजेचे बनले आहे. नगरपालिका पुढाकार घेणार का?शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्यात नगरपालिकेचा पुढाकार आहे. बसस्थानक स्थलांतर झाल्यास ही जागा पालिकेकडे हस्तांतरित करून या ठिकाणी शॉपिंग मॉल, पार्किंगसाठी जागा उपयुक्त ठरून पालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
बसस्थानकाचे स्थलांतर झाल्यास कोंडी होईल दूर
By admin | Published: August 06, 2015 10:04 PM