कोल्हापूर : दुकाने बंद विषयात जिल्हा प्रशासनाची ‘धरलं तर चावतंय...सोडलं तर पळतंय’ अशीच काही अवस्था झाल्याचे चित्र सोमवारी कोल्हापुरात दिसून आले. व्यापाऱ्यांनी कोल्हापूर व इचलकरंजी एकत्र करून स्वतंत्र युनिट करून व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी २१ जूनला केली होती. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी दोन दिवस त्यासाठी प्रयत्न केले; परंतु त्यात यश आले नाही. जिल्हा किंवा पोलीस प्रशासनाकडूनही वेगळे युनिट करण्यासाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी निर्बंध झुगारून दुकाने सुरू केल्यानंतर मग पोलिसांकडून हालचाली झाल्या. हे आधीच झाले असते तर विनाकारण ताण-तणाव झाला नसता. आता तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून कोल्हापूर-इचलकरंजीसाठी दुकाने सुरू करण्यासाठी मंजुरी मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे.
कोल्हापुरात रोज सरासरी दीड हजार रुग्ण सापडत आहेत. मृत्यूही ३०च्या खाली यायला तयार नाहीत. गेल्या आठवड्यात दहा हजारांच्या खाली आलेली रुग्णसंख्या आता पुन्हा साडेअकरा हजारापर्यंत गेली आहे. त्यातच नवीन डेल्टा प्लस विषाणूचा धसका वाढला आहे. त्यामुळे प्रशासन निर्बंध कमी करायला तयार नाही. गेल्या आठवड्यात सलग दोन-तीन दिवस रुग्णसंख्या कमी आल्याने कोल्हापूर आपोआपच चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरामध्ये जाईल, अशी शक्यता होती. परंतु तीदेखील फोल ठरली आहे. त्यामुळे शासन निर्बंध शिथिल करायला तयार नसल्याने प्रशासन त्यानुसार कारवाईच्या भूमिकेत आहे. दुसऱ्या बाजूला व्यापारी, व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. गेली तब्बल ८० दिवस दुकाने बंद आहेत. त्यामुळे सगळा व्यवहार ठप्प आहे. दुकानातील कामगारांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. दुकाने उघडावीत तर प्रशासन पाच हजार रुपये दंडाच्या पावत्या फाडत आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील सुमारे ५० टक्के दुकाने सुरू आहेत. मुख्यत: कापड, सराफ इलेक्ट्रानिक्स, चप्पल बाजार ही दुकाने बंद आहेत. ही दुकाने इतकी दिवस बंद आहेत म्हणून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे, असेही चित्र व अनुभव नाही. दुसऱ्या बाजूला राजकीय कार्यक्रम, मोर्चे, मेळावे, लग्नसमारंभ हे सगळे धडाक्यात सुरू आहे. बँकांच्या दारात रोज रांगा लागत आहेत. रस्त्यावरील गर्दी हटायला तयार नाही. तिथे कोणतेच निर्बंध नसताना मग ही ठरावीक दुकानेच बंद ठेवून कोरोनाला अटकाव कसा होणार आहे, अशी विचारणा व्यापारी करत आहेत व त्यात तथ्य आहे. त्यामुळे यातून काहीतरी सुवर्णमध्य काढण्याची आवश्यकता होती.
पर्याय असाही..
एकाचवेळी दुकाने सुरू झाल्यास जास्त गर्दी होईल, अशी भीती असेल तर ती सम-विषम दिवशी सुरू करता येतील. किंवा एक दिवस जीवनावश्यक व दुसऱ्या दिवशी इतर दुकाने सुरू केली तरी चालू शकतील. खरे तर आता जी गर्दी होत आहे, ती जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासमोरच जास्त होत आहे. लोक रोज सकाळी भाजीपाल्यासाठी पिशवी हातात घेऊन मंडईत फिरताना दिसत आहेत. त्यांना रोखणे हे कोरोनाला रोखण्याइतकेच अवघड बनले आहे.
दुहेरी नुकसान..
काही अटी घालून आता बंद असलेल्या दुकानांनाही परवानगी द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी असून, ती नक्कीच गैर नाही. कपड्यातील दुकानांत दैनंदिन उलाढाल न झाल्यास त्याचा साठा पडून राहतो. जेव्हा केव्हा दुकाने उघडतील तेव्हा लोक हा जुना स्टॉक आहे म्हणून माल घेण्यास नकार देतील, अशीही भीती आहे. त्यातून व्यापाऱ्यांचे दुहेरी नुकसान होणार आहे, याचाही विचार जिल्हा प्रशासनाने करण्याची गरज आहे.