सांगली/आष्टा/इस्लामपूर : --एफआरपी कायद्याचा भंग करून उसाचा दर जाहीर केला आहे. राजारामबापू पाटील साखर कारखाना वाटेगाव आणि साखराळे, सर्वोदय साखर कारखाना कारंदवाडी (ता. वाळवा) आणि हुतात्मा साखर कारखाना वाळवा या कारखान्याच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांविरुध्द अत्यावश्यक वस्तू अधिनियमासह अन्य कलमांखाली फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशा मागणीचा अर्ज आज पोलिसात दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटना व जिल्हा सुधार समितीने हा अर्ज दिला आहे.स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा, गुंडू बाबू वडेर, अॅड. अमित शिंदे (सांगली), अॅड. राहुल माळी, अॅड. अमोल हंबीरराव पाटील यांनी हा अर्ज पोलिसांकडे दिला आहे. त्यामध्ये राजारामबापू कारखाना लि., साखराळे हा नोंदणीकृत कारखाना आहे. येथे शेतकऱ्यांचा ऊस गाळप करून त्यापासून साखर व इतर उपपदार्थांची निर्मिती आणि विक्री केली जाते.सध्या साखराळे शाखेत उसाचे गाळप सुरू आहे. मात्र कारखान्याच्या संचालक मंडळ व कार्यकारी संचालकांनी चालू गळीत हंगामासाठी एफआरपीपेक्षा उसाचा दर कमी जाहीर केला आहे. साखर नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार ऊस दर कमी करणे हा फौजदारी गुन्हा ठरत असल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.आष्टा परिसरातील सर्वोदय, हुतात्मा, राजारामबापू पाटील, वाटेगाव या साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकरी व सभासदांना ऊसदर न दिल्याबद्दल त्यांच्या संचालक व कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, साखर ही अत्यावश्यक वस्तू असल्याने ती तयार करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस किती किमतीचा विकत घ्यायचा, याबाबत ऊस उत्पादकांना निव्वळ देय देणे बंधनकारक आहे. मात्र राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना यांचा साखर उतारा १३.०३ इतका होता. त्यांचा एफआरपीप्रमाणे दर २५३७.६८ रुपये होतो. याप्रमाणेच हुतात्मा, सर्वोदय साखर कारखान्यांचाही दर आहे. त्यांनी तो दिला नाही. यामुळे संचालक, कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संदीप राजोबा यांनी केली आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखाना परिसरातील पोलीस ठाण्यात राजोबा यांनी निवेदन व तक्रारी दिल्या आहेत. (वार्ताहर)
ऊस दर प्रश्नी राजारामबापूसह चार कारखान्यांवर गुन्हा दाखल
By admin | Published: January 05, 2015 11:49 PM