प्रवीण देसाई
कोल्हापूर : निवडणूक कामात सहकार्य न करणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा जिल्हा निवडणूक विभागाने घेतला आहे. याची सुरुवात गेल्या आठवड्यात शिवाजी पेठेतील एका शाळेवर कारवाईने झाली आहे.मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम ३१ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे नवमतदारांनी नोंदणी करावी, तसेच नावातील दुरुस्ती, स्थलांतरामुळे मतदान वगळणी आदी प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
रविवारी सुट्टीच्या दिवशी शाळांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) थांबून मतदान प्रक्रिया राबवत आहेत. गेल्या आठवड्यात शिवाजी पेठेतील महापालिकेच्या एका शाळेत ‘बीएलओ’ गेला असता ती शाळा कुलूप बंद असल्याची आढळली.
शाळेच्या व्यवस्थापनाला कळवूनही दुपारपर्यंत ही शाळा उघडली नव्हती. अखेर तो ‘बीएलओ’शाळे बाहेर बसून राहीला. शाळा भेटीसाठी गेलेल्या जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ या शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कार्य असताना शाळांनी अशा पध्दतीने भूमिका घेणे चुकीचे आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने या कारवाईनंतर अशा पध्दतीने कोणी शाळा बंद ठेवणार असेल तर संबंधित मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याचा बडगा उगारला आहे. तशी कल्पना सर्व शाळांनाही देण्यात आली आहे.
२२ ‘बीएलओ’ना नोटीसआॅक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी गैरहजर राहीलेल्या २२ ‘बीएलओ’ना करवीरच्या प्रांताधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये या ‘बीएलओ’ नी नोटीसीला उत्तर दिली असून काहींनी आजारी असल्याचे कळविले आहे. याबाबत शहानिशा केली जात आहे.