जिल्हाधिकारी देसाई म्हणाले की, शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात नागरिकांची जातीवाचक ओळख संपवण्यासाठी प्रयत्न केले होते. हा आदर्श घेऊन जिल्ह्यात जातीवाचक नावे, आडनावे, अपभ्रंश झालेली नावे बदलण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे जातीवर आधारित कनिष्ठतेची भावना कमी होणार आहे. याबरोबरच जातीवाचक नावे व आडनावामुळे तयार झालेले पूर्वग्रहदूषित विचार नष्ट होतील व सामाजिक समानतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असेल. महसूल व ग्रामपंचायत अभिलेखात अशी नावे शेकडो वर्षे तशीच असून, आता ती बदलण्यास या मोहिमेमुळे वेग येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्वतंत्र परिपत्रक काढण्यात येऊन याबाबतची कार्यपद्धती आखून दिली जाईल. नागरिक व खातेदारांनी यासाठी गावचे तलाठी व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
--
येथून होईल कार्यवाही
७/१२ उतारा, मालमत्ता पत्रक, कर आकारणी, ग्रामपंचायत, घर, उतारा या ठिकाणी अशी जातीवाचक नावे असतील व नागरिकांनी इच्छा असेल तर "महसूल जत्रा" कार्यक्रमात गावागावातील नागरिकांची नावे व आडनावे बदलण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल यांनी सहकार्य करावे. तसेच नाव, आडनाव बदलू इच्छिणाऱ्या नागरिकांनी 'आपले सरकार', 'सेतू' सुविधा केंद्राच्या ऑनलाइन सेवेचा लाभ घ्यावा.,